Breaking News

सासरी छळ झाल्याने नवविवाहितेची आत्महत्या

पतीसह 10 जणांवर गुन्हा दाखल; अकोले तालुक्यातील घटना

अकोले, दि. 25 - पिकअप व मोटारसायकल घेण्यासाठी पैशांची मागणी करून विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करून तिला शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले व तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीसह दहा जणांवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथील सदाशिव नामदेव भोर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 14 एप्रिल 2012 रोजी माझी मुलगी स्वातीचा धोंडिभाऊ लक्ष्मण साबळे (रा.आंभोळ) याच्याशी झाला होता. तिचा पती वारंवार पिकअप व मोटार सायकल घेण्यासाठी पैशांची मागणी करत, तसेच शारीरिक, मानसिक छळ करून शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करीत होता.
नेहमीच्या त्रासाला कंटाळून स्वाती हिने 19 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास फॉरेट नावाचा विषारी पदार्थ घेतला. तिच्या पतीने याबाबत आपल्याला फोन करून स्वातीने विष घेतले असून तिला कोतुळ येथे ग्रामीण रुग्णालयात घेऊन येत असल्याचे सांगितले. तेथून तिला अकोले येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिला संगमनेर येथे एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे 20 एप्रिल रोजी रात्री सव्वा नऊ वाजता तिचा मृत्यू झाला. 21 रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 22 रोजी मयत स्वाती हिचे वडिल सदाशिव नामदेव भोर (वय-45, शेती व आचारी काम, रा. धामणगाव पाट) यांनी अकोले पोलिसांत फिर्याद दाखल केली.
त्यानुसार मयताचा पती धोंडिभाऊ लक्ष्मण साबळे, नणंद आशा ज्ञानेश्‍वर चौधरी (रा. घाटकोपर, मुंबई), उषा प्रदीप पापळ, प्रदीप दत्तू पापळ (दोघे रा. धामणगाव आवारी), जावयाचे मित्र सागर भाऊसाहेब चौधरी, अशोक भाऊसाहेब चौधरी, राजू बाळासाहेब चौधरी, दीपक बादशहा चौधरी, वैभव एकनाथ साबळे, तुषार सुनील देशमुख (सर्व रा. आंभोळ,ता.अकोले) यांच्याविरुद्ध भादंवी कलम 306, 498 अ, 323, 504, 506, 38 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे करत आहेत.