Breaking News

देशवासियांचा जीव इतका स्वस्त नाही, गंभीरचा निशाणा

नवी दिल्ली, दि. 26 - टीम इंडियाचा फलंदाज गौतम गंभीरची बॅट मैदानावर जशी तळपते, तसाच तो ट्विटरवरही बेधडक वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सुकमामध्ये नक्षलींनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर गंभीरने पुन्हा तोंड उघडलं आहे. ‘देशवासियांचा जीव इतका स्वस्त नाही’, अशा शब्दात गंभीरने निशाणा साधला आहे. ‘छत्तीसगड, काश्मीर, ईशान्य भारत या कानठळ्या पुरेशा आहेत की आपण बहिरे झालो आहोत? आपल्या देशातील नागरिकांचा जीव इतकाही स्वस्त नाही, कोणाला तरी याची किंमत चुकवावी लागेल.’ या शब्दात गंभीरने आपला संताप व्यक्त केला आहे.
यापूर्वी काश्मीरमधील जवानासोबत झालेल्या गैरवर्तणुकीवरही गंभीरने बोट ठेवलं होतं. ‘माझ्या जवानांवर हात उगारल्याच्या बदल्यात कमीत कमी शंभर आत्मघातींचा जीव जाईल. ज्यांना स्वातंत्र्य हवं आहे, त्यांनी चालतं व्हावं. काश्मिर आमचं आहे.’ असं ट्वीट त्याने केलं होतं.
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद, तर 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरात सीआरपीएफच्या बटालियन 74 वर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या बटालियनमध्ये 90 जवान होते.