Breaking News

देश निर्माणामध्ये योगदान देऊन देशसेवा करावी : मुद्गल

सातारा, दि. 14 (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून आर्थिक प्रगती साधण्याची संधी निर्माण झाली आहे. मुद्रा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन आणि ती यशस्वी करण्यासाठी एकप्रकारे देशसेवेची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये आपले छोटे-छोटे योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी केले.
बँक ऑफ महाराष्ट्र फलटण शाखा आणि संतकृपा उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कर्ज वितरण सोहळा आळजापूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे अचल प्रबंधक हरिश्‍चंद्र माझीरे, सहायक महाप्रबंधक सिध्दार्थ कांबळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, आरबीआयचे हेमंत दंडवते, संतकृपाचे संस्थापक विलासराव नलवडे, चार्टर्ड अकौंटट व्ही. एस. जाधव, प्रातांधिकारी संतोष जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी यांच्यासह मान्यवरांनी दीपप्रज्ज्लन केले.
मुद्गल म्हणाले, प्रधानमंत्र्यांनी सर्वसामान्य माणसाला मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी जनधन योजना, मुद्रा योजना सुरु केल्या आहेत. या माध्यमातून त्यांनी आर्थिक शिस्तीचे पाऊल उचलले आहे. जनधन खाते, आधार कार्ड, आणि मोबाईल यांच्यावर भविष्यात आर्थिक व्यवहाराची वाटचाल असेल. त्यामुळे सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा. मुद्रा बँक योजनेंतर्गत जिल्ह्यात 301 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचा सिंहाचा वाटा आहे, असे सांगून मुद्गल म्हणाले, संतकृपा उद्योग समुहाची सध्याची झेप वाखाणण्याजोगी आहे. अशा उद्योगाच्या जोरावर समाजाचा आर्थिक स्तर उंचावेल. लाभार्थ्यांनी बँकेशी प्रामाणिकपणे व्यवहार करावा. आपल्या कर्जाची परतफेड वेळेत करावी. मुद्रामुळे मुद्रा कमविण्याची संधी निर्माण झाली आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन आणि ती यशस्वी करण्यासाठी एकप्रकारे देशसेवेची संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने 103 लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 लाखाचे कर्ज देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. याची प्रेरणा इतर बँकांनी घ्यावी, असे आवाहन मुद्गल यांनी केले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीची प्रमाणपत्रे व गायींचे वाटप करण्यात आले.
अंचल प्रबंधक माझीरे म्हणाले, प्रत्येक शेतकर्‍यांनी शेतीपूरक व्यवसाय करणे आवश्यक आहे. त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र सदैव पाठीशी राहील. यावेळी सिध्दार्थ कांबळे आणि व्हि. एस. जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाखाधिकारी वीरेंद्र शहा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जयवंत केंजळे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला संस्थेचे सभासद पदाधिकारी ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.