Breaking News

टंचाई दूर करण्यासाठी उरमोडीचे पाणी माणगंगेत सोडण्याची मागणी

म्हसवड, दि. 20 (प्रतिनिधी) : माण तालुक्यात पाण्याच्या टंचाईची तीव्रता लक्षात घेता उरमोडीचे पाणी किरकसाल बोगद्यातून माणगंगा नदीत सोडण्यात यावे, अन्यथा माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकर्‍यांसमवेत जनआंदोलन उभारण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. सौ. भारती पोळ यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अश्‍विन मुदगल यांना दिला. याप्रसंगी माण पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, योगेश पोळ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत उपस्थित होते. 
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माण तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. टॅकर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत उरमोडी नदीचे पाणी किरकसाल बोगद्यातून गोंदवले मार्गे माणगंगा नदीत सोडल्यास सिमेंट बंधारे भरले जातील. तसचे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटेल. प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीचा विचार न केल्यास जनआंदोलनाचा निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, जिल्हाधिकारी अश्‍विन मुदगल यांनी संबंधित विभागाला तात्काळ उरमोडीचे पाणी सोडण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्याची माहिती दिली. पंचायत समितीचे सदस्य विजयकुमार मगर, प्रशांत विरकर, अमोल पोळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.