Breaking News

वडूज नगरपंचायतीची वसुली मोहीम; थकबाकीदार झळकले फ्लेक्सवर

वडूज, दि. 7 (प्रतिनिधी) : येथील नगरपंचायतीने थकित कर वसुलीची मोहीम हाती घेतली असून पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांची नावे बसस्थानक परिसरातील फ्लेक्स बोर्डवर झळकली आहेत.
नोव्हेंबर महिन्यात वडूज ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान वडूजच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन वीज बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीने तोडले होते. काही रक्कम भरल्यानंतर ते पुन्हा पुर्ववत करण्यात आले होते. मार्च महिन्यात वसुलीसाठी पुन्हा एकदा तोडण्यात आले. नुकत्याच झालेल्या टंचाई बैठकीत त्यावर जोरदार खल झाला. तरीही वीज वितरण कंपनीच्या थकित बिलाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही.
वडूज नगरपंचायतीने वसुलीसाठी कडक पावले उचलली आहेत. ग्रामपंचायत असताना वसुलीचा कारभार असा तसा राहिला असल्याने थकबाकीचा फुगवटा कमी होत नव्हता. सध्या नगरपंचायतीने वसुली मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांची नावे बसस्थानक परिसरात फ्लेक्सवर लावल्याने काही प्रमाणात वसूलला गती येवू लागली आहे. यातील काही थकबाकीदार लखोपती असल्याची चर्चा आहे. थकबाकी मोहीम सुरू झाल्यानंतर लोकांची धावपळ सुरु झाली आहे.
पाणी कनेक्शन अधिकृत की अनधिकृत घरे किती याची खरी माहिती घेण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी केले. नागरिकांनी आपले कर्तव्य नीटपणे पार पाडणे आवश्यक आहे. सोईसुविधा पाहिजे असतील तर कर भरायलाच हवा.