Breaking News

निधीचा अपहार करणार्‍या सरपंच व इतरांना तुरुंगाची हवा

नांदेड, दि. 21 - ग्रामपंचायतीच्या निधीचा अथवा मालमत्तेचा अपहार करणार्‍या सरपंच व इतर पदाधिकार्‍यांना आता तुरुंगाची हवा खावी लागणार असून, त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून अपहाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिला आहे.
ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहारत अनियमितता करणे अथवा ग्रामपंचायत मालमत्तेचा अथवा निधींचा अपहार करणे, ग्रामपंचायतच्या मूळ दस्तऐवजांमध्ये खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे हा गुन्हा असल्याने, या गुन्ह्यास जबाबदार असणार्‍या संबंधित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सचिव, ग्रामसचिव, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा; असा आदेश ग्रामविकास खात्याने नुकताच काढला आहे. अनेक गावांमध्ये शासकीय योजना राबवित असतांना शासकीय अधिकार्यांवर दबावतंत्र राबवून मलई खाण्याचे कित्येक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळेच शासनाने आता फौजदारी कारवाई सोबतच अपहार केलेली रक्कमही वसूल करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत.