Breaking News

बनपुरीच्या मैदानात पै. अमर कुंभार ठरला नाईकबा केसरी

सणबूर, दि. 7 (प्रतिनिधी) : पाटण तालुक्यातील बनपुरी येथील श्री नाईकबा देवाच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानात मोतीबाग तालीम कोल्हापूरचा पै. अमोल फडतरे व तात्यासाहेब मादळे तालीम पुणेचा पै. भारत मदने यांच्यातील एक लाख इनामाची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. तर न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूरचा पै. नयन निकम व जिल्हा तालीम संघ सातार्‍याचा पै. नामदेव कचरे यांच्यात व्दितीय क्रमांकासाठी चुरशीची झुंज झाली. त्यामध्ये पै. नयन याने नामदेव यास चितपट करून 75 हजार रूपयांचे बक्षिस पटकावले. कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रूकचा मल्लआणि क्रांती कारखाना कुंडलचा पै. अमर कुंभार याने पै. वैभव डोंब याला चितपट करून मानाची चांदीची गदा आणि नाईकबा केसरीचा किताब पटकावला.
मंदीर परिसरात यात्रेनिमित्त यात्रा कमिटी, बनपुरी ग्रामस्थ, ग्रामपंचायत बनपुरी व अविनाश पाटील मित्रमंडळाने मैदानाचे आयोजन केले होते. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत पाटील यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन झाले. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन अविनाश पाटील, सुधीर हारूगडे, राजेंद्र मोकाशी, सुर्यकांत मोकाशी, उपसरपंच शिवाजी मोकाशी, शिवाजीराव जगदाळे, विकास जगदाळे, विक्रम पवार, सुरेश सपकाळ या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूरचा पै. अमोल पाटील आणि कासारशिरंबेचा पै. संभाजी कळसे यांच्यात 75 हजार रूपयांच्या बक्षिसाची कुस्ती झाली. यात पै. संभाजी कळसे याने पै. अमोल याला घुटना डावावर चितपट करून कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली. तृतीय क्रमांकाची कुस्ती पै. जगदीश कुमार याला चितपट करून अमोल साठे याने जिंकली, अक्षय मोहिते याने सुनील खताळ वर मात करून चौथ्या क्रमांकाची कुस्ती जिंकली, बनपुरीचा युवा पैलवान सुशांत अविनाश पाटील याने कोल्हापूरचा पै. रोहन पाटील याला चितपट केले. मंद्रुळकोळेच्या गौरव पाटील याने वारणानगरच्या मोहन चव्हाण याला तर कुंडलच्या अनिकेत गावडे याने कराडच्या इंद्रजित तनपूरे याला आस्मान दाखविले.
चांदीची गदा व श्री नाईकबा केसरीच्या किताबासाठी बेलवडे बुद्रूक ता. कराडचा पै. अमर कुंभार व सुर्ली येथील पै. वैभव डोंब यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली. निकालासाठी पंचांना लढतीच्या व्हिडीओ चित्रीकरणाची मदत घ्यावी लागली. त्यानुसार दिलेल्या निकालात पै. अमर कुंभार याने कुस्ती जिंकल्याचे जाहीर करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे, पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले व अविनाश पाटील यांच्या हस्ते चांदीची गदा व मानाचा नाईकबा किताब पै. कुंभार यांना देण्यात आला. सर्वांचे आकर्षण ठरलेली 1 लाखाची प्रथम क्रमांकाची कुस्ती अमोल फडतरे व भारत मदने यांची कुस्ती काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य आशिष आचरे, तहसीलदार रामहरी भोसले, मानसिंगराव नलवडे, प्रकाश जाधव, अविनाश पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. कुस्तीची लढत रंगात आलेली असताना वीज पुरवठा खंडीत झाल्याने व अमोल याच्या हाताला दुखापत झाल्याने कुस्ती सोडविण्याचा निर्णय पंचांनी घेतला. मैदानात सुमारे 80 चटकदार कुस्त्या झाल्या. उपस्थितांनी विजेत्या पैलवानांना वैयक्तिक बक्षिसे दिली.
पंच म्हणून जयकर खुडे, शशिकांत घोडके, गणी मुल्ला, सुनील जाधव, राहुल पाटील, लक्ष्मण पाटील, जगन्नाथ पवार यांनी काम पाहिले. मैदानाचे सलग 5 वर्षे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अविनाश पाटील यांचा अनिल पाटील बुधगाव जिल्हा सांगली मित्र मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. ईश्‍वरा पाटील यांनी मैदानाचे निवेदन केले. कुरूंदवाडच्या आवळे बंधूंनी मैदानात वाजवलेल्या हलगीने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.