Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दूरदृष्टीपणा !

दि. 14, एप्रिल - भारतीय इतिहासात आपल्या अजोड ज्ञानाने व कामगिरीने सार्‍या जगाला चकित करणार्‍या महामानवाची आज जयंती. हजारो वर्षापासुन अस्पृश्यतेच्या चिखलात रूतुन बसलेल्या समाजाला भारतीय संविधानाच्या माध्यमातुन समता स्वातंत्र व न्याय बंधुता प्रदान करून त्यांना खर्‍या अर्थाने माणुसकी प्रदान केली. सर्वात मोठया लोकसंख्या असलेल्या देशात आजही लोकशाही टिकून आहे त्याचे खरे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते. त्यांनी संविधानाच्या माध्यमातुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या शोषीत पिडीत खर्‍या अर्थाने सामाजिक, राजकीय, आर्थिक हक्क प्रदान करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले त्यांना इथल्या शोषित समांजाला त्यांचे हक्क मिळवुन द्यायचे होते त्यामुळेच त्यांना खर्‍या अर्थाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. संविधानसभेत हा मसुदा सादर करणे आणि आणि स्वीकृत करवून घेणे या प्रक्रियेत त्यांची भुमिका सुकाणू धारकाची होती. मसुदा समितीतील डॉ. आंबेडकरांचे एक सहयोगी टी.टी. कृष्णम्माचारी, यांनी संविधान सभेतील एका भाषणात असे प्रतिपादन केले की,संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसर्‍याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवाा दोन व्यक्ती दिल्लीपासून बर्‍याच लांब होत्या आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी ,संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व डॉ. आंबेडकरांवर आले. आणि त्यांनी ते लिलया पेलले. आणि त्यांच्या विदवत्तेचे प्रतिबिंब भारतीय संविधानात बघायला मिळते. देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. नुकत्याच विविध पाच राज्यात विधानसभांच्या निवडणूका पार पडल्या, आणि त्या राज्यातील लोकशाहीच्या उत्सवात आजही भारतीय लोकशाही दिमाखात उभी असल्याचे दिसते. भारतासोबतच अस्तित्वात आलेल्या पाकिस्तान सा देशात लोकशाहीचे शकले उडाली पंरतु भारतीय लोकशाही आजही स्थिर व मजबुत आहे त्याचे कारण बाबासाहेबांची दुरदृष्टी व लोकशाहीसंबधी त्यांना असलेली उत्तम जाण आहे. लोकशाहीने जरी आपली पाळेमुळे घट्ट रोवली असली तरी तिला प्रतिगामी शक्तीकडुन मोठा धोका आहे. विभुतीपुजा आणि व्यक्तीकेंद्रीत राजकारण लोकशाहीला मारक आहे. त्यातुन 16 व्या लोकसभेच्या निवडणुकीत सध्या काही पक्षाकडुन सुरू असलेले राजकारण बघता लोकशाहीला काही प्रमाणात काळीमा फासण्याचे काम चालु आहे. आज भारतीय लोकशाहीच्या कसोटीचा काळ सुरू आहे त्यातुन भारतीय लोकशाही तावुन सुलाखून निघेल यात शंका नाही.स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चितंन करंताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जोपर्यंत इंग्रज सरकार होते तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जवाबदारी आपण त्यांच्यावरच टाकत होतो. पण आता स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जवाबदारी आता आपल्यावर राहणार आहेत.त्यामुळेच लोकशाहीचे रक्षण करण्याची लोकशाहीचा महामेरू असाच तेवत ठेवण्याची गरज आपल्यावर आहे. भारतीय संविधानात पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क स्त्रियांना देण्यासाठी बाबासाहेब आग्रही होते. हिंदू कोड बिल (महिला हक्क कायदा) मंजूर होत नाही म्हणून केंद्रिय कायदा मंत्रिपद सोडणारे बाबासाहेब स्त्री हक्कांबाबत कोणतीही तडजोड करायला तयार नव्हते. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले होते, तुमच्या मुलामुलींना शिक्षण द्या. त्यांच्या मनात महत्त्वाकांक्षा रुजवा. ते मोठे होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा. त्यांच्यातील न्यूनगंड नाहीसा करा. बाबासाहेब जगातील सर्वच स्त्रियांना वंदनीय आहेत. आजच्या स्त्री- मुक्ती चळवळीने या द्रष्टया बाबासाहेबांचा आदर्श घेतला तरच स्त्रीपुरुष समतेची चळवळ गतिमान आणि आरोग्यदायी बनेल. पांढरपेशी चळवळीतील उच्चवर्णीय स्त्रियांना ही जाणीव केव्हा होईल? बाबासाहेब यांनी फक्त एका जाती जमातीसाठी कष्ट घेतले नसुन अखिल मानवजातीच्या उध्दारासाठी आपले  आयुष्य वेचले. अशा या थोर क्रांतीसुर्याला महामानवाला जंयतीनिमित्त विनम्र अभिवादन.