Breaking News

जलयुक्तमुळे शेतीसाठी शाश्‍वत पाणी उपलब्ध : सहपालकमंत्री

सातारा, दि. 25 (प्रतिनिधी) : पाण्याचा प्रत्येक थेंब शिवरात अडविण्यासाठी व तो जिरविण्यासाठी शासन जयलुक्त शिवार ही महत्वकांक्षी योजना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राबवित आहे. या योजनेमुळे शेतकर्‍यांच्या शेतीसाठी शाश्‍वत पाणी उपलब्ध झाले आहे, असे प्रतिपादन सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी व उद्योगिक कृषी प्रदर्शन 2017 चे उद्घाटन सहपालकमंत्री खोत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, कृषी सहसंचालक नारायण शिसोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी चांगदेव बागल, उपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर पाटील, रवीराज देसाई, अशोक पाटील, जयवंत शेलार उपस्थित होते.
ठिबकच्या अनुदानासाठी समिती स्थापन केली आहे, असे सांगून खोत म्हणाले, ऊसाला पाणी जास्त लागते त्यामुळे राज्य शासन 3 लाख हेक्टर क्षेत्र ठिबकखाली आणण्याचा विचार करत आहे. यासाठी साखर कारखान्यांनी पुढकार घेतला पाहिजे. शेतकर्‍यांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून 125 कोटी कांदाचाळींसाठी दिले आहेत. शासनाचा शाश्‍वत शेतीवर मोठा भर आहे. शेतकर्‍यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यावर भर देत आहे. ग्राहकांना ताजा आणि वाजवी भावात भाजीपाला उपलब्ध होण्यासाठी शेतकरी व ग्राहकांसाठी संत शिरोमणी सावता माळी आठवडे बाजार विविध जिल्ह्यांमध्ये भरविण्यात येत आहे. व्यापार्‍यांच्या तुलनेत स्वत:चा फायदा कमी आणि ग्राहकांचा फायदा जास्त अशी भावना जपणार्‍या शेतकर्‍यांना आपल्या पिकवलेल्या मालातून दोन पैसे मिळत आहेत.
महोत्सवाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचण्यास मदत होते. या कृषी महोत्सवातून शेतकर्‍यांना चांगली  बाजारपेठ निर्माण झाली आहे. अशा महोत्सवांमुळे शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. कृषी महोत्सवामध्ये कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांसाठी असणार्‍या विविध योजनांची माहिती दिली जाणार असल्याचे खोत यांनी सांगितले.
पाटणचे आमदार शंभूराज देसाई म्हणाले, राज्य शासन हे लोकांसाठी काम करणारे शासन आहे. राज्य शासनाने जलयुक्त शिवार आणि रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. पाटण तालुक्यासाठी जलसंपदांच्या कामासाठी 185 कोटी निधी तर रस्त्यांच्या कामांसाठी 32 कोटी निधी प्राप्त झाला आहे. शेतकारी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. शासनाने साखर धोरण वेगळ्याने तयार करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. पी. जाधव यांनी केले तर अशोक पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.