Breaking News

19 हजाराची लाच स्वीकारताना वनक्षेत्रपालासह वनपाल जाळ्यात

सातारा, दि. 25 (प्रतिनिधी) : तक्रारदारांनी कोयना अभयारण्यात नाला बिल्डींगचे केलेल्या कामाच्या मोबदल्यात तसेच वाढीव कामाचे बिल काढण्यासाठी व भविष्यात कामे देण्यासाठी वन्यजीव कार्यालय, कोयनानगर येथील वनक्षेत्रपाल राजेंद्र रावसो पाटील व वनपाल सुदाम विष्णु माने या दोघांना 19 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
 तक्रारदारांच्या तक्रारीनुसार दि. 24 एप्रिल रोजी केलेली पडताळणी व सापळा कारवाईमध्ये राजेंद्र रावसो पाटील (वय 31 वर्षे, वनक्षेत्रपाल सध्या रा. फॉरेस्ट कॉलनी, कोयनानगर रासाटी मुळ रा. पाडळी खुर्द, ता. करवीर, जि. कोल्हापूर) व सुदाम विष्णु माने (वय 54 वर्षे, वनपाल सध्या रा. सुर्वे बिल्डींग, रामापुर पाटण, मुळ रा. मस्करवाडी, पोस्ट अंबवडे बु., ता. जि. सातारा) यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती 19 हजार 500 रुपये लाच रक्कम वनपाल सुदाम विष्णु माने यांनी वन्यजीव कार्यालय, कोयनानगर येथे स्वीकारल्यानंतर त्यांना पकडण्यात आले. त्यांच्या विरुध्द कोयनानगर पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे, सहायक फौजदार कुलकर्णी, पोहवा सपकाळ, तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, अजित कर्णे, प्रशांत ताटे, विनोद राजे, संभाजी काटकर यांनी केली.