Breaking News

अहमदनगरच्या पर्यटनाला सरकारने चालना द्यावी ; सत्यजीत तांबे यांची पर्यटन मंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर, दि. 14 - अहमदनगर हे 500 वर्षाची समृद्ध परंपरा असलेले शहर आहे. शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू असून, पर्यटन विभागाने यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेत, शहराच्या व जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी. यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावा. अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
मुंबई येथे राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेवून याबाबतचे निवेदन दिले. यामध्ये ते म्हणाले अहमद निजाम शहाने 1490साली या शहराची स्थापना केली असून, नगरची तुलना ही कैरो व बगदाद या शहरांशी केली आहे. व्यापारी पेठ व संतांची भूमी असलेल्या निजानंद भैरवी, शहाशरीफ ,मेहरबाबा, आचार्य आनंद ऋषी यासंह स्व. पंडीत जवाहरलाल नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य राहिले आहे. जगप्रसिद्ध डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथही येथे लिहला गेला आहे.
या शहरात माळीवाड्यातील विशाल गणपती, चाँदबीबी महल, दमडी मजिद, फराहकक्ष महल, ऐतिहासिक भुईकोट किल्ला, हत्तीबारव , भिंगारचे शुक्लेश्‍वर मंदिर, रेल्वेस्टेशन, रेणुका मंदिर , बुर्हाणनगर मंदिर,अमृतेश्‍वर मंदिर,आनंदऋषीची महाराज समाधी, माळीवाडा गेट, गोलघुमट, भिंगार चर्चे, दत्त मंदिर, पटवर्धन वाडा, राम मंदिरा, हुतात्मा स्मारक, सीना नदी असे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या स्थळांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अहमदनगर हे राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. शिर्डी व शनी शिंगणापूर येथे देशभरातून येणार्या भाविकांची संख्या मोठी आहे.