गाव स्वावलंबनासाठी कृषि उद्योगांना निधी देणार - पालकमंत्री
जिल्हा हगणदारीमुक्त संकल्प सोहळा थाटात; मोताळा तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीला आयएसओ प्रमाणपत्र
बुलडाणा, दि. 25 - गावांना स्वच्छतेबरोबरच पाणीपुरवठा, रस्ते व आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून काम करीत आहे. गावांना स्वच्छ-सुंदर बनविण्यासाठी शासनाने हगणदारीमुक्तीचा संकल्प जाहीर केला आहे. मार्च 2018 पर्यंत संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त करावयाचा आहे. यासोबतच गावांना स्वावलंबी बनवायचे आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून राज्य शासन छोटे-छोटे कृषि प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे गावे स्वावलंबी होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास राज्याचे कृषि तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज व्यक्त केला.जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा हगणदारीमुक्त संकल्प सोहळा, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार तसेच स्मार्ट व्हिलेज पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सहकार विद्या मंदीर विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार हर्षवर्धन सपकाळ, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, उपाध्यक्षा मंगलाताई रायपूरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिपा मुधोळ, जिल्हा परिषदेचे सभापती श्रीमती श्वेता महाले, दिनकर देशमुख, डॉ. गोपाल गव्हाळे, राजेंद्र उमाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी नेमाने आदींसह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात प्रथम आलेली व स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत ‘स्मार्ट’ ठरलेल्या पांगरखेड गावाचा अन्य गावांनी आदर्श घेण्याचे आवाहन करीत पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्याने हगणदारीमुत्तीचे 61 टक्के क्षेत्र व्यापले आहे. उर्वरित 39 टक्के क्षेत्र हगणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी काम करावे. सरपंच, ग्रा.पं पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी गावाला स्वच्छ करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग वाढवावा. जेणेकरून जिल्हा संपूर्ण हगणदारीमुक्त होईल.
प्रास्ताविक श्रीमती दीपा मुधोळ यांनी केले. त्या म्हणाल्या, स्मार्ट गावांमध्ये स्वच्छतेबरेाबरच घन कचरा व्यवस्थापन, वृक्ष लागवड, संपूर्ण शौचालय बांधकाम व वापर आदी उपक्रम राबविण्यात येतात. मनरेगातंर्गत ग्रामपंचायतींनी खर्च करावा. प्रत्येक ग्रामपंचायतीने खर्च वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवल्यास गावांचा विकास होईल. आमदार हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले, स्वच्छतेचा वसा सर्व गावांनी स्वीकारावा. या स्वच्छतेच्या यज्ञामध्ये सर्व ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींनी हिरीरीने सहभाग घ्यावा. जिप अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. तसेच पांगरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती अंजली सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे व जि.प मुकाअ दिपा मुधोळ यांची बदली झाल्यामुळे त्यांचा पालकमंत्री यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पालकमंत्री यांच्याहस्ते पंचायत समिती स्तर व जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यातून आलेले सरपंच, पुरस्कारप्राप्त गावांचे पदाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी, गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आदींसह कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रप्रसंगी प्रशांत जोशी यांनी मार्गदर्शन केले. संचलन चंद्रशेखर जोशी यांनी, तर आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजपूत यांनी केले.
पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती पंचायत समिती व जिल्हा स्तर
संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान जिल्हा स्तर पुरस्कार : प्रथम - पांगरखेड ता. मेहकर, द्वितीय - अजिसपूर ता. बुलडाणा, तृतीय- संयुक्तरित्या मोरखेड बु. ता. मलकापूर व मुंगसरी ता. चिखली.
पंचायत समिती स्तर ः (प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार अनुक्रमे) : बुलडाणा - अजिसपूर, हतेडी खु व पळसखेड नागो, चिखली : मुंगसरी, मालगणी व टाकरखेड मुसलमान, दे.राजा - दगडवाडी, सावंगी टेकाळे व सूरा, सिं.राजा - भोसा, वसंतनगर व अडगांव राजा, लोणार - गोत्रा, भानापूर व हिवरा खंड, मेहकर - पांगरखेड, नागापूर व कल्याणा, खामगांव- पातोंडा, पिंप्री कोरडे व कौंटी, शेगांव - माटरगांव खुर्द, रोकडीया नगर व आडसूळ, जळगाव जामोद- कुरणगड, पळसखेड व सुलज, संग्रामपूर- काकनवाडा खु., करमोडा व जस्तगांव, नांदुरा - धानोरा विटाळी, कोकलवाडी व वाडी बु., मोताळा - शेलगांव बाजार, जहांगीरपूर व टेंभी, मलकापूर - मोरखेड खु, निंबारी व शिराढोण. तसेच हगणदारी मुक्त पंचायत समितींचे पुरस्कार मलकापूर व शेगांव पंचायत समितीला देण्यात आले. स्मार्ट ग्रामपंचायतीचा 40 लक्ष रूपयांचा पुरस्कार पांगरखेड ता. मेहकर ग्रामपंचायतीने पटकाविला आहे. विशेष पुरस्कारांमध्ये दगडवाडी ता. दे.राजा गावाला सामाजिक एकता पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर कुटूंबकल्याणचा विशेष पुरस्कार भोसा ता. सिं.राजा गावाला आणि पाणीव्यवस्थापन व गुणवत्तेचा विशेष पुरस्कार धानोरा विटाळी ता. नांदुरा गावाला प्रदान करण्यात आला.
स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत पुरस्कार प्राप्त गावे : अजिसपूर ता. बुलडाणा, मुंगसरी ता. चिखली, पांग्री ता. दे.राजा, भोसा ता. सिं.राजा, अंजनी खु ता. लोणार, पांगरखेड ता. मेहकर, पिंप्री कोरडे ता. खामगांव, येऊलखेड ता. शेगांव, सुलज ता. जळगांव जामोद, काकनवाडा खु ता. संग्रामपूर, धानोरा विटाळी ता. नांदुरा, दाभाडी ता. मोताळा व सिराढोण ता. मलकापूर.