Breaking News

टँकरच्या भाड्यात भ्रष्टाचार; वडूज येथे आत्मदहनाचा प्रयत्न

वडूज, दि. 30 (प्रतिनिधी) : सन 2012 च्या दुष्काळसदृष्य स्थितीत पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याने मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सदाशिव निकम यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी महसूल विभागाच्या कार्यलयाला बाहेरून कड्या लावल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
2012 च्या टंचाई परिस्थितीत खटाव तालुक्यातील गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामध्ये संबंधित अधिकार्‍यांनी भ्रष्टाचार केला आहे. पाच वर्षांपासून अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेता अधिकार्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. तत्कालीन उपविभागीय अधिकारी व ठेकेदारांच्याविरुध्द तक्रार केली होती. उपविभागीय अधिकार्‍यांची चौकशी वरिष्ठ अधिकार्‍याने करणे गरजेचे होते. या प्रकरणात चौकशीसाठी नायब तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली.
 परंतु त्यांनी चौकशी न केल्यामुळे पुन्हा तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी चौकशी केल्याचे भासवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. या काळात पाणी पुरवठा करणारा मूळ टँकर मालक सदाशिव निकम होता. यांच्याकडून कोणतीही कागदपत्रे न घेता टँकर पाणी वाहतुकीस लावला. संबंधित ठेकेदार व तत्कालीन प्रांतांनी वाहने पाणी पुरवठ्यावर लावली. या वाहतुकीच्या बिलाचे लाखो रुपये काढले. याबाबत गत पाच वर्षांपासून कागदोपत्री तक्रारी करून देखील कोणतेही कारवाई न झाल्याने निकम यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या संदर्भात प्रांतांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत सायंकाळपर्यंत या संदर्भात लेखी खुलासा करणार असल्याचे अभिवचन प्रशासनातर्फे निकम यांना दिले. आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. निकम यांच्या मित्र परिवाराने व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या दारांच्या कड्या लावून निषेध व्यक्त केला.