Breaking News

बाल विवाह प्रतिबंधासाठी ग्रामसभांमध्ये ठराव व्हावेत : रामदास भोर

। अंगणवाडी सेविकांसाठी सचेतन कार्यशाळा
अहमदनगर, दि. 07 - स्त्रियांच्या संरक्षणासाठी सरकारने अनेक कायदे केलेले आहेत. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. यासोबतच स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणेही गरजेचा आहे. यातूनच स्त्रियांवरील अत्याचार कमी होवू शकतात. बालविवाहांमुळे होणारे दुष्परिणाम भयानक असतात. तरीही आपल्याकडे सर्रासपणे बालविवाह केले जातात. त्याला प्रतिबंध घालण्यासाठीही कायदा असला तरी त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे गावागावात जनजागृती आवश्यक असून नगर तालुक्यातील गावांमध्ये ग्रामसभांमध्येच बालविवाह प्रतिबंधाबाबत ठराव घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन नगर तालुका पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांनी केले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना नगर ग्रामीणच्यावतीने सी.एस.आर.डी.मध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत बालविवाह प्रतिबंध अधिनियम विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सभापती भोर बोलत होते. या सचेतन कार्यशाळेस प्रमुख व्याख्यात्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या ऍड.रंजना गवांदे यांच्यासह बालविकास प्रकल्प अधिकारी सुरेश टेळे, गोविंद इसानकर, शिवाजी खुडे, पर्यवेक्षिका प्रणिता बारवकर, सुजाता वाकचौरे, शोभा तापकीर, पूजा पाडळे, सिमा चव्हाण, सुनंदा सुडके आदी उपस्थित होते.
सभापती भोर पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात बालविवाह होण्याचे प्रमाण जास्त आहे. अनेकवेळा बाल विवाहाबाबत सर्वांना माहिती असूनही कोणी तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्याला अनेक सामाजिक तसेच स्थानिक पातळीवरील कारणे असतात. परिणामी चांगला कायदा होवूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. अशा परिस्थितीत बाल विवाह प्रतिबंधासाठी समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. गावागावात व्यापक जनजागृती करतानाच कायद्याचा प्रसार केल्यास एक प्रकारे धाक निर्माण होवून बाल विवाहांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे भोर यांनी सांगितले.
प्रास्ताविकात बाल विकास प्रकल्प अधिकारी गोविंद इसानकर म्हणाले की, बाल विवाह प्रतिबंध अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा नाही. गावपातळीवर ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांनाच प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून अंगणवाडी सेविकांनी आपल्या आजूबाजूला होणारे बाल विवाह रोखण्यासाठी जागृत रहावे तसेच समाजात जास्तीत जास्त जागृती करावी.