पालकमंत्री गटाचा वरचष्मा, सुभाष देशमुख गटाला झटका
सोलापूर, दि. 23 - महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षात स्वीकृत नगरसेवक निवडीवरून घडलेल्या राजकीय डावपेचात पालकमंत्री विजयकुमार देशमुख गटाने दोन्ही जागा आपल्या गटाकडे खेचून घेत सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाला चांगलाच तडाखा दिला. त्यांचे विश्वासू अविनाश महागावकर यांचाच पत्ता कट झाला. तर नवख्या मुन्ना वानकर यांना संधी दिली गेली. या निमित्ताने पक्षातील गटबाजी इंद्रभुवन परिसरात उघडपणे समोर आली. या घोळात सकाळी 11 होणारी निवड दुपारी 1.30 वाजता झाली. भाजपच्या वाट्याला दोन सदस्यपदे मिळाली. त्यासाठी आठ जण इच्छुक होते. या दोन्ही जागेवर पालकमंत्र्यांच्या गटाची सरसी झाली. मुन्ना वानकर आणि प्रभाकर जामगुंडे ही दोन्ही नावे त्यांच्या मर्जीतील आहेत. या राजकीय फिल्डींगमुळे सुभाष देशमुखांचे विश्वासू अविनाश महागावकर यांचा पत्ता कट झाला. शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी अविनाश महागावकर यांचेही काही चालले नाही. त्यांना सभागृह नेते सुरेश पाटील यांनी थारा दिला नाही. या विषयावर जवळपास अडीच तास राजकीय हालचाली झाल्या. या सर्व प्रकारातून भाजपतील गटबाजी स्पष्टपणे दिसून आली. भाजपचा पारदर्शक कारभार सत्ता मिळाल्यानंतर महिनाभरातच गळून पडल्याची राजकीय चर्चा वर्तुळात होती.
