Breaking News

तूर खरेदी प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज

औरंगाबाद, दि. 26 - आता मराठवाडयात तूर खरेदीचा प्रश्‍न गंभीर झाला असून काात काही शेतकर्‍यांनी तूर जाळली तर आज मुख्यमंत्र्यांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी अन्नदाता संघटनेने पैठण पोलिसांत अर्ज दाखल केला आहे तर विरोधीपक्षनेते धनंजय मुुंडे यांनी बीडमध्ये तूर खरेदी केंद्रांना भेट देवून अंदोलनाचा इशारा दिला आहे. शनिवारी 22 एप्रिलला नाफेडनं तूर खरेदी बंद केली. तारखेपर्यंत जेवढी तूर आली तेवढी खरेदी करा असे आदेश आल्याने लातुरसह अनेक ठिकाणी आज माप सुरु आहे. पण नव्याने तूर आणू दिली जात नाही. एकट्या लातूरात किमान लाखभर टन तूर खरेदीच्या प्रतिक्षेत आहे. ही खरेदी पुन्हा सुरु करावी अन्यथा मंत्र्यांना फिरु दिले जाणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने राजकुमार सस्तापुरे यांनी दिला आहे. तुरीला हमी भाव मिळाला आहे. नाफेडने याच भावाने खरेदी केली. बाजारात यापेक्षा कमी भावाने तूर खरेदी केली जात असल्यानं त्यावर बंदी आली, व्यापार्‍यांना नोटिसा निघाल्या. यामुळे लातुरच्या बाजारात दिवसांपासून तुरीचा सौदाच निघाला नाही. व्यापारी हमी भाव देऊ शकत नाही, सरकार कमी भावाने खरेदी करु देत नाही. परिणामी शेतक्यांचा माल तसाच पडून आहे. तालुक्याच्या ठिकाणी तर बाजार समित्यांच्या आवारात आणलेली तूर अद्याप शेतकर्‍यांनी परतही नेली नाही. शेवटपर्यंत तूर खरेदी केली जाईल असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण मधल्या काळात दोनदा खरेदी थांबली. तीनवेळा मुदतवाढ दिली गेली. पण आता असे शक्य दिसत नाही. 22 एप्रिलपर्यंत जेवढी तूर आली ती सगळी खरेदी करा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तूर कमी भावात विकण्याऐवजी शेतमाल तारण योजनेत ठेवावी असा सल्ला पणनमंत्र्यांनी दिला आहे. दरम्यान देशातल्या तुरीची विक्री व्हावी यासाठी तुरीच्या आयातीवरील कर वाढवण्याची सूचना सरकारमधून केली जात आहे. राज्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले असताना निर्यातीला मात्र परवानगी दिली जात नाही! त्या मुळे मराठवाडयातील तूर उत्पादक हतबल झाला असून पैठणला अन्नदाता संघटनेने मुख्यमंत्र्यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.