Breaking News

सफाई कामगार संपावर, पनवेल महापालिका क्षेत्रात कचर्‍याचे ढीग

पनवेल, दि. 17 - विविध प्रलंबित मागण्यांसाठी पनवेल महापालिकेच्या सफाई कामगारांनी बुधवार म्हणजे 12 एप्रिलपासून संप पुकारला आहे. सलग सहा दिवस कचरा उचलला न गेल्याने पनवेल, खारघरसह महापालिका क्षेत्रातील विविध भागांना डम्पिंग ग्राऊंडचं स्वरुप आलं आहे. पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोडसमधील सहा लाख नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातीत खारघर, कळंबोली, खांदा वसाहत, कामोठे आणि कळंबोली या सिडको नोडसचा यामध्ये समावेश आहे.  मात्र हे नोड्स अद्याप महापालिकेकडे हस्तांतरीत झाले नसल्याने या भागातील दैनंदिन कचरा उचलण्याचं काम सिडकोकडून केलं जातं. सिडकोने त्यासाठी 22 कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. या कंत्राटदारांच्या माध्यमातून तब्बल 1300 सफाई कामगार कचरा उचलण्याचं काम करतात. मात्र, प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या मागण्यांसंदर्भात सिडकोकडून अजूनपर्यंत कोणतंही ठोस आश्‍वासन मिळालेलं नाही. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कामगारांचं नेतृत्व करणार्‍या कोकण श्रमिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कामगारांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा निघत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.