Breaking News

शहरातील कालबाह्य रिक्षांवर कारवाई होणार

पुणे, दि. 20 -  शहरात मोठ्या प्रमाणावर कालबाह्य रिक्षा दिसून येत आहेत. ‘स्क्रॅप’ न करता रस्त्यांवर धावणार्‍या या रिक्षांमुळे पर्यावरणाला धोका असून अशा रिक्षांवर कारवाई करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी दिला आहे.
आनंद पाटील यांनी नुकताच पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला. यानिमित्त दैनिक प्रभात’ने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली. 1984 साली स्थापन झालेल्या या कार्यालयाचे ते 16 वे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत. या कार्यालयाला भेडसावणार्‍या समस्या मार्गी लावण्याबरोबरच आपल्या काळात अनेक कामे मार्गी लावण्याचा त्यांचा संकल्प आहे. या नियुक्तीबाबत ते म्हणाले की, पनवेलहून याठिकाणी नियुक्ती झाली असलो, तरी देखील यापूर्वी 1998-99 मध्ये मी पुणे जिल्ह्यात मोटार वाहन निरीक्षक पदावर काम केले आहे. त्यामुळे हा परिसर मला ओळखीचा आहे. याठिकाणी काम केल्याच अनुभव मला निश्‍चित कामी येईल.
सध्या रस्त्यावर स्क्रॅप न केलेल्या शेकडो रिक्षा धावत असल्याकड त्यांचे लक्ष वेधले असता, प्रवाशांचा प्रवास सुखाचा होवो, याकरिता वाहनांची स्थिती उत्तम असली पाहिजे. मात्र, स्क्रॅप न करता रिक्षा रस्त्यांवर धावत असल्यास ही गोष्ट योग्य नाही. अशा रिक्षांची माहिती घेऊन, त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देईन. बेवारस, जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यास आपले प्राधान्य असेल, असेही त्यांनी सांगितले.
आरटीओ कार्यालयाला भेडसावणार्‍या समस्यांबाबत ते म्हणाले, या भाडे तत्वावरील कार्यालयाची जागा कामकाजासाठी अपुरी पडत आहे, हे प्रकर्षाने जाणवत आहे. याकरिता नव्याने प्रशस्त कार्यालयात कार्यालय स्थलांतर करण्यास मी प्राधान्य देणार आहे. नवीन कार्यालयात मूलभूत सोई-सुविधांची पूर्तता अद्याप व्हायची आहे. याकरिता पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन हा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न राहिल, असे त्यांनी सांगितले.