Breaking News

आंबेडकर जयंतीनिमित्त मोदी दीक्षाभूमीवर, नागपुरात स्वागताची तयारी

नागपूर, दि. 14 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौर्‍यावर येणार आहेत. त्यामुळे सध्या नागपुरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोदींचा ताफा ज्या रस्त्यावरुन जाणार आहेत ते रस्तेही चकाचक केले जात आहेत. पंतप्रधान मोदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीला भेट देतील. त्यानंतर मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण केलं जाणार आहे.
विशेष म्हणजे दिल्लीतल्या जेएनयूचा विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारही दीक्षाभूमीत येणार आहे. त्यामुळे मोदी आणि कन्हैया कुमार समोरासमोर येणार नाही, याचीही काळजी घेण्यात येणार आहे. दीक्षाभूमीवर अर्धा तास थांबल्यानंतर मोदी कोराडीत पोहोचतील. याठिकाणी ते कोराडी, चंद्रपूर आणि परळीतल्या नव्या वीज संचाचं लोकार्पण करतील. यामुळे राज्याची वीज उत्पादन क्षमता 3 हजार 230 मेगावॅटने वाढणार आहे.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मागील नागपूर दौर्‍यावेळी मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं. अडीच वर्षात मेट्रोच्या उभारणीसंदर्भात मोठं बांधकाम नागपुरात झालं आहे. मोदींचा ताफा वर्धा रोडवरून प्रवास करताना विमानतळाच्या अगदी बाहेर त्यांना मेट्रोचं काम पाहायला मिळेल. मोदींच्या दौर्‍याच्या निमित्ताने प्रशासनाने मेक्सिकोच्या धर्तीवर मेट्रो रेल्वेच्या दोन पिलर्सवर विशेष वॉल गार्डन उभारले आहेत. भारतात पहिल्यांदाच रेल्वे प्रकल्पात हा प्रयोग करण्यात आला आहे. कोराडी औष्णिक वीज केंद्रातून मोदी एक वाजता मानकापूर क्रीडा संकुलला जातील. डिजिटल पेमेंटबद्दल केंद्र सरकाच्या डीजी धन योजनेसंदर्भात नीती आयोगाच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील. तिथेच मोदींचं भाषण होईल