Breaking News

1200 रोडरोमियोंना दणका, पंढरपुरात ’निर्भया’ पथकाची कारवाई

पंढरपूर, दि. 14 - शाळकरी मुलींना त्रास देणार्‍या रोडरोमियोंना पोलिसांच्या निर्भया पथकाने चांगलाच दणका दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि अकलूज परिसरात 1200 पेक्षा जास्त तरुणांवर कारवाई करण्यात आली आहे.
शाळकरी मुलींना तरुणांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पंढरपूर आणि माळशिरस या दोन्ही तालुक्यात निर्भया पथकाकडून रोडरोमियोंना चाप बसवण्यास सुरुवात करण्यात आली. या निर्भया पथकाची दहशत रोडरोमियोंमध्ये पसरल्याचं चित्र आहे. नुकत्याच पार पडलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अशा रोडरोमियोंवर कडक कारवाई केल्याने मुलींना कोणत्याही अडचणींशिवाय पेपर देता आले. मुली आणि पालकांकडून माहिती घेत पोलिसांनी त्यांच्या विभागात रोडरोमियो आणि तरुणांकडून त्रास होणारी ठिकाणे निश्‍चित केली. त्या ठिकाणी निर्भया पथकामार्फत तरुणांचं शूटिंग काढून त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या रोडरोमियोंचे आई-वडील आणि कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या मुलाचे प्रताप त्यांच्यासमोर आणले.
पंढरपूरमधील कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्वात मोठं महाविद्यालय आहे. जवळपास 10 हजार मुलामुलींचा येथे राबता असतो. ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी बसने पंढरपुरात येतात. या मुलींची बस स्थानकावरच छेड काढली जाते. पोलिसांनी अशा सर्व जागा हेरून त्या त्या ठिकाणी निर्भया पथकाचा वावर ठेवला. रोमियोगिरी करणार्‍या तरुणांना उचलून कारवाईस सुरूवात केली.