Breaking News

वरिष्ठांच्या जाचास कंटाळून मनपा; कर्मचार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न




वरिष्ठांच्या जाचास कंटाळून मनपा; कर्मचार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न
अहमदनगर, दि.1 महापालिकेतील कर्मचारी अजित हरिविजय तारू या कर्मचार्‍याने  वरिष्ठांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कामगार युनियनचे अनंत लोखंडे, आनंद वायकर, नगरसेवक किशोर डागवाले, बाळासाहेब बोराटे यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने त्या कर्मचार्‍यास सदर कृत्यापासून ते परावृत्त करू शकले.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मनपा युनियनने  मनपावर मोर्चा आणत वरिष्ठ अधिकार्‍यांचा निषेध करून चौकशीची मागणी केली. या प्रकाराचे पडसाद मनपाच्या  सभेतही उमटले व या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
महापौर अभिषेक कळमकर यांनी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यास बोलावून घेवून सदर  प्रकाराबाबतचा अहवाल आयुक्तांकडे मागवला आहे.
दरम्यान विद्युत विभागाचे अधिकारी साबळे यांना मनपाच्या सभेत सदर कर्मचार्‍यांचा अर्ज वाचण्यास डागवाले व बोराटे यांनी सांगितले. त्यामध्ये कर्मचार्‍याने लिहीले आहे की, माझी बदली केली जात असताना माझा कोणताच विचार केला जात नाही. या अगोदर माझी बदली दुसर्‍या वायरमनच्या अडचणीमुळे झाली. परत दुसर्‍या वायरमनच्या अकार्यक्षमतेमुळे माझी बदली करीत आहात. संबंधित भागातील नगरसेवकांची माझ्याबाबत कोणतीही तक्रार नाही.
परंतु, आपणामार्फत माझ्याविषयी दुराग्रह त्यांच्या मनात निर्माण करून माझी प्रतिमा आपण मलिन करू पाहत आहात. आपण वारंवार मानसिक त्रास देत आहात. त्यामुळे माझे मनोधैर्य कमी होत चालले आहे. मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेत आहे. यास सर्वस्वी आपण जबाबदार आहात, असे  अर्जात म्हटले आहे.