बाळासाहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले असते तर...?
प्रति,
छगन चंद्रकांत भुजबळ,
माजी महापौर, मुंबई,
माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, बांधकाम मंत्री, माजी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार येवला
सद्यस्थितीत आरोपी नं.1
मुक्काम - अंडा बॅरक नंबर -12,
आर्थर रोड, मध्यवर्ती कारागृह,
भायखळा, मुंबई.
महोदय,
छगन चंद्रकांत भुजबळ! तुमच्या पाळीव अधिकार्यांनी माझ्या घराची सलग 13 तास झडती घेतली. एक चिटोरे सुध्दा सापडले नाही. रिकाम्या हाताने परत जायचे कसे या लाजेस्तव तोंड लपविण्यासाठी पोलीस अधिकार्यांनी सार्वजनिक कामाच्या माझ्या 11 फाईली उचलून आणल्या. पत्रकारांना मुलाखत देताना महत्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे सांगितले. आजतागायत जप्त केलेल्या फाईलीमधील एकहि कागद न्यायालयासमोर आणला नाही. असा कुठलाही कागद तेलगी व माझ्यात व्हावा असे घडलेच नव्हते. त्यामुळे मी निश्चित होतो. उलटपक्षी तुमच्या ठिकठिकाणच्या बंगल्यामधे अनेक कार्यालयात 4/5 फॉर्महाऊसवर झालेल्या झडतीत तर, भुजबळ कंपनीच घबाडच सापडले. शेकडो नव्हे, हजारो कोटी रूपयांची संपत्ती सापडली. अॅम्ब्युलन्सचा उपयोग रूग्णाच्या सेवेसाठी केला जातो, असा आम जगभरातील जनतेचा समज आहे. अत्यवस्थ रूग्णास वेळेत रूग्णालयात पोहचवता यावे. या कारणास्तव अॅम्ब्युलन्सना, सिग्नलच्या नियमांमधून सूट आहे. टोल नाके सुध्दा मोकळे असतात. तुम्ही तर, देशाला नवीन आदर्श धडाच दिला. काळे पैसे अॅम्ब्युलन्सच्या मार्गाने सुरक्षित पोहचविले जातात. तरीही तुम्ही म्हणता, माझ्यावर अन्याय झाला, यालाच म्हणतात आक्रस्थळेपणा, कोडगेपणा!!
तेलगी प्रकरणातून तुम्ही कसे बसे सुटलात. खर तर, तुमचा शाहिस्तेखान झाला. बोटावरच निभावले. ते केवळ शरद पवारांच्या कृपा छत्रामुळेच! याही उपर तेलगीकडून आपण कोट्यावधी रूपये स्विकारल्याचे पोलीस अधिकार्यांच्या नार्को टेस्ट व ब्रेन मॅपींग तसेच लायडिटेक्टरच्या टेस्टमधे आले. जयस्वालला राष्ट्रपती पदकाची पडली होती यासाठीच तुमचेच पाळीव जयस्वालांनी आपल्या अटकेची पूर्ण तयारी केली होतीच! काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आता काळहि आला अन् वेळहि! सर्वच वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांमध्ये आपण मा. न्यायधिशांपुढे हात जोडून उभे आपल्या अंगभूत असलेल्या अभियनाचा अविष्कार मा. न्यायधिशांना दाखवून विनवण्या करीत होतात. अखेर रडलात सुध्दा ! आसू मेरे दिलकी जुबान है! असे विनवून-विनवून, वाकून-वाकून सांगितले. परिणाम शून्य ! ‘आंसू मगरमछ के क्यों ना हो, मगर आसू आसू ही होते है !’’ आता आठवा! मीही तुमच्याकडे रामटेक बंगल्यावर आलो होतो! तुम्हाला हात जोडून विनंती केली मी दोषी असेल तर, मला जरूर अटक करा पण माझ्या मुलाला अकारण यात गोवून त्याचे आयुष्य बरबाद करू नका ! तम्ही तुमचा ठेवणीतल्या खर्जातील आवाजात सुनावले की, तुम्ही आमचे सरकार पाडायला निघाले ना? गोटे, तुम्हाला गंमत वाटली काय? आपल्या प्रश्नाच्या उत्तरात शेवटचे वाक्य तुम्हाला सांगितले की, खमी जी राजकीय मस्ती केली त्याची किँमत मी चुकवेन! पण माझ्या मुलाचं आयुष्य बरबाद करून माझे कुटुंब उध्वस्त करू नका.’ पण तुमच्यासारख्या हृदयशुन्य, निष्ठूर व क्षुद्र मनोवृत्तीच्या व्यक्तीस ऑर्थर रोडच्या अंडा सेलमध्ये आता निश्चित जाणीव होत असेल की, बापाचं दु:ख काय असतं? लक्षात ठेवा! दशरथ राजाच्या चुकीने अंधारात सुटलेल्या बाणाने श्रावणबाळाला मृत्यू आला, त्याच्या आईवडिलांनी दशरथ राजाला श्राप दिला, तू सुध्दा असाच पुत्र वियोगाने मरशील! मिस्टर भुजबळ तो दिवस आता दूर नाही. मला अटक केल्यानंतर तुम्ही फुशारकीने नागपूर अधिवेशनात सांगितले की, बरे झाले ! अनिल गोटे विधीमंडळाचे उपाध्यक्ष झाले नाहीत. नाहीतर, केवढे मोठे संकट राज्यावर ओढवले असते. काय परिस्थिती निर्माण झाली असती? महाराष्ट्राची किती बदनामी झाली असती? खरेच! तुम्ही शिवसेनेत असता अन बाळासाहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले असते तर काय स्थिती झाली असती महाराष्ट्राची? एवढी तरी निश्चित नाहीच!
भुजबळ तुम्ही किती दृष्ट बुध्दीचे, कुपमंडूक वृत्तीचे, खुनशी आणि हलकट आहात याची महाराष्ट्राच्या जनतेला जाणीव करून दिली पाहिजे. येरवडा तुरूंगात मी बंदीस्त असतांना तुमच्या एकाही दबावाला बळी पडत नाही हे आपल्या लक्षात आले. लगेच पुण्याच्या तुरूंग अधिकार्यांना आपल्या कार्यालयातून सतत दूरध्वनीवरून माझी छळवणुक करण्याचे आदेश आपले खाजगी सचिव व पी.ए. देत असत. तेलगी प्रकरणातील आम्हा सर्वांना अंडासेलमधे ठेवले होते. एव्हाना आपलाही अंडासेलशी परिचय झाला असेलच ! आता कुठे चार-दोन दिवस झाले म्हणे पहिल्या दिवशी तुम्हाला रात्रभर झोप आली नाही. टि.व्ही. चॅनेलवर असे सांगितले जाते. कशी येईल झोप? एक तर, रात्रीच्या झोपेचे औषध पुरविण्याची सोय तुरूंग व्यवस्थापनास करता येत नाही. तुम्ही बांधकाम मंत्री असंतांना दूरदृष्टी ठेवून जसे अंडासेलच्या बांधकामाच्या फाईलवर सही केली. तशीच रात्रीच्या औषधाची व्यवस्था करण्याची तरतूद जेल म्यान्युएलमधे केली असती तर ही वेळ न येती !
दुसरे म्हणजे तुम्हाला तुमची करणी अन् केलेली पापे आठवत असतीलच !! योगायोगाने तुम्हाला तुमचे पुतणे समीर आणि मला रात्री ठिक साडेदहा वाजता अटक केली. आठवा, सुबोध जयस्वालला आपण रात्री 10.15 मिनिटांनी फोनवर आदेश दिले. मला अटक करा! रात्रीचा तुमचा चढलेला हुकमी आवाज मी स्वत: ऐकला. माझ्या समोरच जयस्वाल वाकडे मोबाईलवरून बोलत होते. मला स्पष्ट ऐकू येत होते. मला अटक करताच त्यांना विचारले झोपायची व्यवस्था कुठे त्यांनी मला पोलीस अधिकार्यांच्या रेस्ट हाऊसमध्ये ठेवले. त्यांना वाटले मला झोप येणार नाही. मी रडेन, बोंबलेन, शिव्या शाप देईन! पण असे काहीच घडले नाही. अंथरूणावर अंग टाकताच मी पाच मिनिटात शांतपणे झोपलो. सकाळी 7.00 वा. बंदोबस्ताला असलेल्या पोलीस शिपायाने उठवल्यावरच झोप मोड झाली. माझं मन मला सांगत होतं, तु काही केलच नाही, तू निश्चित रहा, न्याय देवता तुला न्याय देईलच! माझा अनुभव म्हणून सांगितले. तर, मूळ मुद्दा होता तुमच्यातील अंतर्गत सुप्त सदगुणांचा महाराष्ट्राच्या जनतेला परिचय करून देणे. तुरूंगात टाकल्यानंतरहि कुठल्याहि दबावाला मी बळी पडत नाही हे पाहून तुमचे पित्त न खवळले तरच नवल! पाळीव, वेठबिगार पोलीस अधिकारी जयस्वाल वाकडे टोळीने माझी पत्नी सौ. हेमा, लंडनमधे शिक्षण पूर्ण करून आलेला व मारूती मोटर्समध्ये डेप्युटी मॅनेजर असलेला माझा मुलगा सिध्दार्थ, पायलट व्हायचे स्वप्न सोडून आपल्या बापाला बाहेर काढण्यासाठी दिवस-रात्र जीवाचा आटापिटा करणारा तेजस माझा मेहूणा निलेश केळकर यांना एस.आय.टी. ऑफीसमध्ये सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत एका झाडाखाली बसवून ठेवले. 10 तास उन्हात बसून होते. मागून पिण्याकरीता पाणी सुध्दा कुणी दिले नाही. उपाशी तहानलेले बिचारे! माझ्याशी ऋणानुबंध; एवढाच त्यांचा दोष! काही चुकीचे केले नसतांना दिवसभर बसवून ठेवले. कुणीतरी उपटसंभू येवून एखादे दोन प्रश्न विचारून निघून जात असे! सायंकाळी 6 चे सुमारास तेजस आणि माझा मेहुणा यांना छगन वाकडेंनी दम दिला. तुम्हाला दोघांना अटक करावी लागेल! त्यांनी सांगितले की, करा अखेरीस सायंकाळी 7 वाजता घरी जायला सांगितले. विधीमंडळात कधी तुरूंग व्यवस्थापनाचा विषय निघाला की, मी बोलायला उभा राहत असे, आपण कुत्सीतपणे हसत होतात. आठवा एक-एक क्षण! तुम्ही पुतण्याला अडकवून पंकजला सोडवून घेतले! बकरे का बाप कब तक दुवाँ माँगेगा? भुजबळ खुदा के घर मे देर है, अंधेर नाही! हर इन्सान को एक मौका जरूर मिलता है!! आपण केलेल्या पापाचा राम द्यायची वेळ आली की, आपणास घाम येतो. छातीत दुखते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. अखेरीस रूग्णालयात भरती होवून तोंड लपविण्यासाठी हक्काची जागा शोधायची ! जुनी खोड अन अनुभव आपल्या पाठीशी आहेच ! इतर वेळी कधी तुम्ही आजारी पडलात असे ऐकीवात नाही. पण छंगाट मागे लागल की, आजारी पणाच कारण पुढे येत ! तेलगी प्रकरणात सुध्दा तुम्ही बीच कँडीत दाखल झालात! अस्वस्थ वाटते या कारणास्तव ! याहि वेळेस आपण आजाराचे सोंग तर वठवले. पण परिणाम शून्य !!