संस्कारमय शिक्षण पध्दती देशाची ताकद : गडकरी
कराड, 28 - कोणतीही पदवी माणसाला सुशिक्षित बनविते, मात्र सुसंस्कृत बनवेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळेच चांगला माणसू घडविण्यासाठी संस्काराची नितांत आवश्यकता आहे. ज्ञानाबरोबर जेव्हा संस्कार मिळतात, तेव्हा व्यक्ती परिपूर्ण बनते आणि अशाच व्यक्तीला समाजमान्यता लाभते. ज्ञान आणि संस्कार यांचा एकत्रित आविष्कार घडविणारी मूल्याधिष्ठीत शिक्षणपध्दती ही आपल्या देशाची सर्वांत मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख अतिथी या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा होते. व्यासपीठावर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. व्ही. नाडकर्णी, आरोग्य विज्ञान संचालक डॉ. आर. के. अयाचित, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य विनायक भोसले, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. सौ. आर. के. गावकर, वित्तअधिकारी पी. डी. जॉन, वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, वैद्यकीय विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एस. टी. मोहिते, दंतविज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. शशि किरण, फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलू, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. एस. सी. काळे, व्यवस्थापकीय मंडळ सदस्या डॉ. सुजाता जाधव उपस्थित होते.
सोहळ्यात विद्यापीठातील 426 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये डॉ. सुप्रिया पाटील, सुरेशबाबू सयाना, सुनीता टाटा, महादेव शिंदे यांना कुलपती डॉ. वेदपकाश मिश्रा यांच्या हस्ते पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
गडकरी म्हणाले, ज्ञान मिळविणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण ज्ञानाबरोबर संस्कारही महत्त्वाचे आहेत. समाजात अनेक लोक आहेत, ज्यांनी कोणतीही पदवी घेतलेली नाही, पण त्या व्यक्ती अभ्यासाचे विषय बनल्या आहेत. त्यांच्यावर पीएचडी केली जात आहे. समाजासाठी उपयोगी पडेल असे कार्य करण्याचा प्रयत्न पदवीधारकांनी व शिक्षित लोकांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यापीठाचा पदवीदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वोच्च क्षण असतो. वैद्यकीय पदवी घेणारे विद्यार्थी आता सामाजिक क्षेत्रात पदार्पण करत आहेत. लोकांच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक उन्नती या चार तत्त्वांमुळे शिक्षण प्रक्रियेला चालना मिळत असल्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. शिक्षण हा प्रगतीचा मार्ग आहे, ही भूमिका बाळगून स्व. जयवंतराव भोसले आप्पांनी हयातभर कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टीतून हे विद्यापीठ साकारले असून, आता हे विद्यापीठ देशातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनत चालले असल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.