Breaking News

तेलगी घोटाळ्याचे भुत मानगूटीवर बसणार?

 मुंबई/प्रतिनिधी । 28 - गृहमंत्रीपदाचा दुरूपयोग करून बहुचर्चित तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात स्वतःची मान सोडवून घेत इतरांना फसविणारे भुजबळ यांनी आर्थररोड न्यायालयीन कोठडीत आत्मपरिक्षण करावे व प्रायश्‍चित घ्यावे असा सल्ला आ. अनिल गोटे  आणि संजय कोकीळ यांनी दिला आहे. 
महाराष्ट्र सदन आणि तत्सम प्रकरणातील घोटाळा आणि त्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या मनी लॉन्ड्रींग संदर्भात छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हे काका पुतणे आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीचा अनुभव घेत आहेत. विशेष म्हणजे छगन भुजबळ हे गृहमंत्री असतांना त्यांनी मंजूर केलेल्या अंडासेलमध्येच मुक्काम करण्याची वेळ त्यांना आली आहे. भुजबळ सध्या घेत असलेल्या अनुभवाची वेगवेगळ्या पातळीवर खिल्ली उडविली जात असली तरी भुजबळ हे सत्तेवर असतांना त्यांनी कुणाकुणाला कसे छळले याविषयी देखील आता चर्चा झडू लागल्या आहेत. सन 1999 - 2003 च्या दरम्यान महाराष्ट्रच नव्हे देशपातळीवर गदारोळ उडवून देणारा 36 हजार कोटींचा बनावट स्टँप तेलगी घोटाळा या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला असून केवळ गृहमंत्रीपदाची कवचकुंडले ल्यायली होती म्हणूनच छगन भुजबळ यांच्या मानगुटीवर बसु पाहणारे भूत उतरविण्यात त्यांना यश आले त्याच गृहमंत्रीपदाचा दुरूपयोग करून भुजबळ यांनी राजकीय वाटचालीत अडचणीचे ठरू पाहणार्‍या अनेक राजकीय नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर सुड उगविल्याचे आरोप तेंव्हाही झाले होते, त्याच आरोपांना साबां घोटाळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. गृहमंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी कसा राजकीय सुड उगविला? 
तेलगी घोटाळ्यातून स्वतःची मान सोडवून घेण्यासाठी आ. अनिल गोटे यांचा कसा बळी दिला? त्यावेळी कुठल्या कुठल्या पोलीस अधिकार्‍यांवर दबाव आणून खोटे पुरावे निर्माण करण्याचा प्रयत्न भुजबळ यांनी केला. इथपासून तर स्टँम्प घोटाळ्याचा प्रामाणिकपणे तपास करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना तुरूंगात कसे सडविले इथपर्यंत सारा प्रवास आ. अनिल गोटे यांनी शब्दबध्द केला आहे. आ. गोटे यांच्या प्रमाणेच पेट्रोल भेसळीचे रॅकेट उद्ध्वस्त करू पाहणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय कोकीळ यांनाही खोट्या प्रकरणात अडकविण्यासाठी भुजबळांनी कुठला द्राविडी प्राणायाम केला त्यांचीही पत्र कथा स्वतः संजय कोकीळ यांनी लिहिली आहे. आ. अनिल गोटे-संजय कोकीळ या दोघांनीही शब्दबध्द केलेले भुजबळ गाथा अन व्यथा त्यांच्याच शब्दात बुधवार दि. 30 मार्चपासून क्रमशः प्रसिद्द करीत आहोत.