Breaking News

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा अर्थसंकल्प मंजूर

नाशिक/प्रतिनिधी। 26 - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 376 कोटी 72 लाखांचा अर्थसंकल्प अधिसभेत नुकताच मंजूर झाला. अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे, राज्यातील विभागीय केंद्रांच्या इमारतींसाठी शंभर कोटींची तरतूद केली आहे. त्यात ऐरोली (मुंबई) आणि औरंगाबादसाठी प्रत्येकी 25, नागपूर आणि पुण्यासाठी प्रत्येकी 20, तर कोल्हापूरसाठी दहा कोटींचा समावेश आहे. विद्यापीठाच्या आवारात परीक्षा भवन उभारण्यासाठी 21 कोटींची तरतूद केली. 
कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर अधिसभेच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. सुभाष भोयर यांनी अर्थसंकल्प सादर केला. कुलसचिव डॉ. काशीनाथ गर्कळ यांनी संचलन केले. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी अशा तिन्ही प्रमुख घटकांना जोडणारा अर्थसंकल्प तयार केला आहे. अर्थसंकल्प परीक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प व योजना या तीन प्रकारांत विभागला गेला आहे. विद्यापीठाचे एकत्रित उत्पन्न 375 कोटी 96 लाख असून, उत्पन्नाच्या तुलनेत होणार्‍या खर्चाचा विचार करता वित्तीय तूट 75 लाख 95 हजारांची अपेक्षित आहे. 
डॉ. म्हैसेकर म्हणाले, की अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी भरपूर तरतुदी केल्या आहेत. मोठ्या प्रमाणात विकासकामे प्रस्तावित केली आहेत. ही कामे विद्यापीठाच्या उत्पन्नाधिक्यमधून जमा झालेल्या गंगाजळीतून करण्यात येतील. विद्यार्थ्यांना संवादकौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी अर्थसंकल्पात 25 लाखांची तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पंदन यूथ फेस्टिव्हल, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, इंद्रधनुष्य आदींसाठी 58 लाखांचे उद्दिष्ट ठेवले आहे. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट सुटू 
नये म्हणून धन्वंतरी विद्याधन योजना, पुस्तकपेढी योजना, बहिःशाल शिक्षण, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, कमवा आणि शिका योजना, विद्यार्थी अपघात विमा यांसारख्या कल्याणकारी योजनांसाठी दोन कोटी 80 लाख विद्यापीठ देणार आहे. विद्यार्थ्यांनी मानसिक ताणतणावामुळे आत्महत्येला प्रवृत्त होऊ नये यासाठी मानसिक समुपदेशनासाठी पाच लाख देण्यात येणार आहेत. 
वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून सहा लाख खर्च करण्यात येतील. त्याचबरोबर महाविद्यालये आणि वसतिगृहांमध्ये रॅगिंगसारखे प्रकार होऊ नयेत म्हणून विद्यापीठामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी दहा लाखांची तरतूद केली आहे. याखेरीज आपत्कालीन व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांना शिक्षण, खेळासाठी प्रोत्साहन मिळावे यांसह वैद्यकीय सामाजिक उत्तरदायित्व निधीची स्थापना करण्यात आली. या चर्चेत आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, डॉ. सुधीर ननंदकर, डॉ. मानसिंग पवार, वैद्य यशवंत पाटील, डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. स्वप्नील तोरणे, डॉ. पवन डोंगरे, डॉ. किशोर मालोकर, डॉ. गिरीश मैदरकर, डॉ. सुरेश पाटणकर, वैद्य एकनाथ कुलकर्णी, वैद्य रागिणी पाटील व डॉ. ज्ञानेश्‍वर चिंते आदी सहभागी झाले.