Breaking News

सांगलीत सराफांचे आंदोलन सुरु

सांगली, दि. 26 - केंद्र शासनाने लागू केलेल्या एक टक्का अबकारी कराविरोधात सराफांच्यावतीने पुन्हा आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. अबकारी कराचा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला आहे. आंदोलन सुरु असतानाही एखाद्या सराफ व्यावसायिकाने दुकान उघडल्यास, त्यास दहा हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
दरम्यान, संघटनेच्यावतीने अबकारी कर कायद्याची होळी करत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनाबाबत निर्णय घेण्यासाठी पुणे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत अबकारी कराचा निर्णय रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.  केंद्र शासनाने सोन्यावर एक टक्का अबकारी कर लागू केला असून, या निर्णयाविरोधात जिल्हा सराफ समितीच्यावतीने बेमुदत बंद आंदोलन सुरु केले होते. 
रविवारी यावर तोडगा निघाल्याने सराफी दुकाने उघडण्यात आली होती. मात्र, ठोस आश्‍वासन न घेता बंद मागे घेतल्याने संघटनेत संघर्ष निर्माण झाला होता. अखेर मंगळवारी पुणे येथे झालेल्या बैठकीत बंद सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.  बुधवारी सराफ समितीच्यावतीने अबकारी कर कायद्याची होळी करीत निषेध व्यक्त करण्यात आला. अंतिम सकारात्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे राज्य समितीचे उपाध्यक्ष किशोर पंडित यांनी सांगितले. सराफ व्यावसायिकांनी आंदोलन पुन्हा सुरु केल्याने, नेहमी गजबजलेल्या सराफ पेठेत शुकशुकाट जाणवत आहे.