भुजबळांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी ईडीचे पथक नाशिकमध्ये दाखल
नाशिक/प्रतिनिधी । 26 - माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांचा फास आवळण्याची तयारी ‘ईडी’ ने तीव्र केली आहे. चार जणांचे ईडीचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून, भुजबळांच्या सर्व मालमत्तेची पाहणी करणार आहे. भुजबळांच्या मालमत्तेवर टाच आणली जाणार का ? याबद्दलचा सस्पेन्स अजून गुलदस्त्यात आहे.
मनी लाँड्रिंग आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सद्या ऑर्थर रोड जेलमध्ये मुक्कामी आहे. ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. शुक्रवारी ईडीची चार जणांची टीम नाशिकमध्ये दाखल झाली. मात्र, ईडी नाशिकमध्ये नक्की भुजबळांच्या मालमत्तेवर टाच आणणार की केवळ नोटीस बजावणार ते अजून स्पष्ट झालेले नाही. भुजबळांच्या मालमत्तेचा तपशील ईडीने कोर्टात सादर केला होता. त्या सर्व मालमत्तेचं स्पॉट इन्सपेक्शन करण्यासाठी ईडीची टीम नाशिकमध्ये आली असण्याची शक्यता आहे. याआधी गिरणा सहकारी कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे जप्तीची नोटीस देण्यासाठी ईडीची टीम कारवाई करण्याची शक्यता आहे.
भुजबळांच्या फार्म हाऊसवर किरीट सोमय्यांची धडक
छगन भुजबळ यांच्या फार्महाऊसवर जाण्याचा प्रयत्न भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या चले जाओ च्या घोषणा देत, परिसर दणाणून सोडला.सोमय्यांनी महाराष्ट्र सदन आणि पैशांच्या अफरातफरीप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांवर आणखी नवे आरोप केले आहेत. भुजबळांनी नाशिकमध्ये उभारलेल्या बंगल्यासाठी अशोक बिल्डकॉन या कंपनीचा पैसा वापरला, या व्यवहारात 40 कोटींचा भ्रष्टाचार झाला, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. भुजबळांचा राजमहल 100 कोटींवर आहे. अशोक बिल्डकॉन या कंपनीच्या पैशांनी भुजबळांनी बंगला बांधला. टोल कॉन्ट्रॅक्टरच्या पैशातून भुजबळांनी बंगला बांधला, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.