Breaking News

जातियवाद्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी निदर्शने

नाशिक/प्रतिनिधी। 28 - निफाड तालुक्यातील प्रगतशील गाव म्हणून परिचित असलेल्या पिंपळगाव (ब.) येथे काही जातीयवादी व संधीसाधू लोकांनी स्थानिक बहुजन समाजावर दहशत निर्माण करण्याकरीता निफाड फाट्यावर असलेल्या गार्डनमधील संविधान प्रतिमेची तोडफोड केली व त्या चौकात अतिशय प्रक्षोभक भाषणे करून महामानव तथागत गौतम बुध्द व बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अर्वाच्च भाषेत मत व्यक्त केले. 
त्या सर्व भाषणांची व्हिडिओ शुटींगमध्ये दिसणार्‍या व भडकाऊ प्रक्षेभक भाषण करणार्‍या सर्व नेत्यांवर व लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल व्हावेत त्याचप्रमाणे बौध्द वस्तीला संरक्षण मिळावे. सवर्ण व बहुजन समाज यांच्यात पुन्हा सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे या मागणीकरीता अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. 
या आंदोलनात राहुल तुपलोंढे, नितीन रोटे पाटील, अविनाश आहेर, अनिल आठवले, रमेश पाथरे, विष्णू मगर, अनिल कळंके, सतिश संसारे, सुमित आहिरे, गणेश कंकाळ, सागर गांगुर्डे, राहूल खरे, संतोष गांगुर्डे, त्याचप्रमाणे पिंपळगाव (ब.) येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यानंतर जिल्हाधिकारी यांच्यावतीने नायब तहसिलदार एम.एस.शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मागण्याकरण्यात आल्या की, निफाड फाट्यावरील तोडफोड केलेली संविधान प्रत प्रतिकृती त्वरित बसविण्यात यावी. बौध्द समाजाच्या वस्तीला पोलीस संरक्षण देण्यात यावे, जिल्हाधिकारी यांनी सवर्ण व बहुजन समाजाच्या प्रमुख व्यक्ती व समाजबांधव यांची एक संयुक्त सभा 
बोलवावी, त्याचप्रमाणे पिंपळगाव बसवंत येथे पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याकरीता शासकीय पातळीवर नियोजन करण्यात यावे.