अविरतपणे रुग्णसेवा देण्याचा उपक्रम कौतुकास्पद
अहमदनगर । प्रतिनिधी । 26 - ईश्वर सेवा समजून रुग्णसेवा करणार्या आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अत्यंत सेवावृत्तीने दर्जेदार रुग्णसेवा होत आहे. आनंदऋषीजी महाराजांच्या आशिर्वादाने हॉस्पिटलचे कार्य अत्यंत उत्कृष्टपणे चालू आहे. 24 तास गोर-गरीब जनतेसाठी अविरतपणे रुग्णसेवा देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
पुढील काळात या रुग्णसेवेची व्याप्ती अधिक वाढवावी, होळीच्या शुभमुहूर्तावर आरोग्य शिबीराचे आयोजन करुन संयोजकांनी रुग्णांच्या जीवनात आरोग्यदायी रंग भरण्याचे कार्य करण्यात येत आहे, असे प्रतिपादन एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक राहुल पवार यांनी केले. आचार्य श्री आनंदऋषीजी यांच्या 24 व्या पुण्यस्मृतीनिमित्त सौ.मंगलाताई रुणवाल (बिजापूर) परिवाराच्यावतीने आनंदऋषीजी हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ अहमदनगर सेवायात्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत कान,नाक, घसा तपासणी शिबीराचे उद्घाटन एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि.राहुल पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि.विनोद पाटील, सहा.पो.नि. रणजित गलांडे, विधी सल्लागार अॅड.प्रमोद मेहेर, अॅड.आर.आर. खंडेलवाल, तज्ञ डॉ.सुकेशनी गाडेकर, सिटी बोरा कॉलेज, शिरुरचे प्रा.डॉ.सुनिल भोईटे, लायन्स सेवायात्रीच्या अध्यक्षा सौ.लता कटारिया, अल्पना गांधी, सरोज कटारिया, डॉ.वसंत कटारिया, डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.आशिष भंडारी, अनिल मेहेर, वसंत चोपडा आदिंसह मोठ्या संख्येने रुग्ण व नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना अॅड.मेहेर म्हणाले, सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात सर्वचजण सामाजिक उपक्रम राबवितांना दिसत आहेत, उपक्रम सुरु करणे सोपे असते, मात्र त्यात सातत्य ठेवून उपक्रमाची व्याप्ती वाढविणे अवघड असते. गेल्या 15 वर्षांपासून आरोग्य शिबीराचा उपक्रम राबवून आनंदऋषीजी हाॅस्पिटलने महान कार्य केले आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा घेणे आरोग्याच्या बाहेर गेले आहे. मात्र आनंदऋषीजी हाॅस्पिटलमध्ये वर्षानुवर्ष अत्यंत अत्यल्प दरात सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उत्कृष्ट आरोग्य सुविधा मिळत आहे. आरोग्य सुविधांबरोबरच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवास, भोजन देण्याचा उपक्रमही राबविण्यात येत आहे. प.पू. आनंदऋषीजी महाराजांचाच आशिर्वाद या सर्व
कार्याला असल्याने कधीही काही कमी पडणार नाही. यावेळी शिरुरचे डॉ.सुनिल भोईटे म्हणाले, व्याधीग्रस्त रुग्णांच्या समस्या दूर करुन त्यांना जीवदान देण्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उत्कृष्ट सेवा देण्यात येत आहे. एखाद्या मोठ्या खाजगी रुग्णालयापेक्षाही अधिक चांगल्या उत्तम सेवा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे. शिरुर येथे दरवर्षी होणार्या रक्तदान शिबीरामध्येही आनंदऋषीजी ब्लब बँकेचे मोलाचे योगदान असते. डॉ.वसंत कटारिया म्हणाले, लायन्स क्लब ऑफ सेवायात्रीच्या मोठ्या सहकार्याने या ठिकाणी चांगले काम करता येत आहे.
आनंदऋषीजी महाराजांना अपेक्षित असेच काम त्यामुळे होत आहे. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात अनिल मेहेर म्हणाले, जैन सोशल फेडरेशन व आनंदऋषीजी हॉस्पिटल मार्फत राबविले जात असलेल्या उपक्रमांची ख्याती आता महाराष्ट्र बाहेरही पोहचली आहे, त्यामुळे महाराष्ट्र बाहेरुनही रुग्ण आता आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये येवून व्याधीमुक्त होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आशिष भंडारी यांनी केले तर आभार डॉ.प्रकाश कांकरिया यांनी मानले. या शिबीरात एकूण 256 रुग्णांची तपासणी करण्यात आली. मंगळवार दि. 29 मार्च रोजी दंत तपासणी व उपचार शिबीर होणार असून, डॉ.सौ. मंजुषा गांधी व डॉ.श्रीकांत सायंबर रुग्णांची तपासणी करणार आहेत.