विरोधकांचा वचननामा नव्हे, तर भंपकनामा ः काळे
अहमदनगर । प्रतिनिधी । 26 - विरोधकांनी प्रचाराचा नारळ फोडताना प्रसिध्द केलेल्या वचननाम्यात कुठलीही विचारधारा, आर्थिक ताळमेळ नसलेली आश्वासने सभासदांना देण्यात आली आहे. हा वचननामा नसून भंपकनामा असल्याचा आरोप विद्यमान अध्यक्ष बी.एम.काळे यांनी केला आहे.
पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्यांची सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रगती पॅनलच्या वतीने मुळा पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात घेण्यात आलेल्या प्रचार सभेत काळे बोलत होते. यावेळी पॅनलचे उपप्रमुख एस.व्ही.ठोंबरे समवेत उमेदवार व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.काळे म्हणाले की, व्याजदर 9 टक्के व 6 टक्के करु, सभासद मृत पावल्यास 100 टक्के कर्ज माफ, कर्जाच्या चेकच्या रकमेवर शेअर्स कपात, संस्था 5 वर्षात स्वभांडवली करु व ब वर्ग सभासदांचा 1 लाख रुपयाचा विमा अशी अनेक आश्वासने वचननाम्यात विरोधकांनी दिली आहे. अशी आश्वासने कशी
पुर्ण करणार यांचे स्पष्टीकरण अपेक्षित असताना, कोठेही आश्वासनावर न बोलता सर्व मुद्दयांना बगल देण्यात आली आहे. जिल्हा बँकेचे 4.50 कोटीच्या कॅश क्रेडिटवर 11 टक्के व्याजदर सभासदांच्या ठेवि 10.25 टक्के व्याज असताना कर्जावर 9 टक्के व 6 टक्के दराने दिले तर संस्था एका महिन्यात तोट्यात जाईल हा तोटा कसा भरुन काढणार? याचे उत्तर विरोधी पॅनल प्रमुखाने द्यावे. सभासद मृत पावल्यास 6 लाख कर्ज माफ करु म्हणतात परंतू सभासदास दीड लाख रु. देतांनाच तारेवरची कसरत करावी लागते. सहा लाख कसे माफ करणार? हे प्रश्न उपस्थित होत असताना, भंपकनाम्यातील सर्वच गोष्टीचा बारकईने विचार केल्यास संस्थेची वाटचाल दिवाळखोरीकडे चालू होईल. एक रुपयाची संस्थेत ठेव नसणार्यांनी संस्थेची उठाठेव करु नये. वरील सर्व मुद्याचे स्पष्टीकरण विरोधकास मागावे अन्यथा मतदानाच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवावा असे आवाहन त्यांनी केले आहे. पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्यांची सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रगती पॅनलच्या प्रचार सभेत बोलताना विद्यमान अध्यक्ष बी.एम.काळे समवेत उमेदवार व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.