जलसाक्षरता ही काळाची गरज
राज्यात दुष्काळाचे सावट असतांना पाण्याचा वापर आपण किती बेदरकारपणे करतो, त्यामुळे पाण्याची बचत ही अनन्यसाधारण आहे. त्यासाठी प्रत्येकाला जलसाक्षर करणे तितकेच महत्वाचे.पाण्यासारख्या महत्वाच्या विषयाकडे आपण संवेदनशीलतेने पाहत नसल्यामुळेच आज पाण्याचे दुर्मिक्ष पहायला मिळत आहे.
तहान लागल्यावर विहीर खोदण्याची मानसिकता बदलून पाण्याचे महत्व ओळखायला हवे. राज्यातील दुष्काळी भागातील महिला पुरुष पाण्याच्या एका हंड्यासाठी मैलोनमैल पायपीट करीत असल्याचे चित्र डोळ्यासमोर असतानाही आपण पाणी बचतीसाठी काही करत नाही. आपण साक्षर असलो तरी जलसाक्षर नाही हाच संदेश आपल्या कृतीतून देत आहोत. भविष्यातील पाणीबाणी टाळण्यासाठी पाण्याचा योग्य वापर करायला शिक
ले पाहिजे.पाण्याच्या बचतीतूनच पाण्याची निर्मिती करता येते. पावसाळ्यात पडणार्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविला पाहिजे. पुनर्भरण करून पाणी अडविले पाहिजे. छतावर पडणारे पाणी शोषखड्डा करून साठवले पाहिजे. शेतात शेततळ्याची निर्मिती करून योग्यवेळी त्या पाण्याचा वापर करणे शक्य आहे. दुष्काळगस्त भागातील शेतकर्यांनी शेततळ्यांच्या माध्यमातून वर्षभर पीक घेऊन आपले जीवनमान सुधारले असून दुष्काळावर यशस्वी मात केली असल्याची अनेक उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. बागायतदार शेतकर्यांनी उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले तर त्यांना वर्षभर शेती पीक घेता येईल.आधुनिकतेची कास धरून बागायतदार शेतकर्यानी ठिंबकाद्वारे पिकांना पाणी दिले तर लाखो लिटर पाण्याची नक्कीच बचत होईल. विहिरीतील पाण्याची पातळी कायम राहण्यासाठी पाण्याचे पुनर्भरण होणे गरजेचे आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर व्हायला हवा. साठवलेल्या पाण्याचा प्रभावी व परिणामकारक वापर होणे महत्वाचे आहे. त्यासाठी गामस्थांमध्ये जलसाक्षरता निर्माण होणे गरजेचे आहे. समाजसेवी संघटनादेखील जलजागृतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जलसाक्षरतेबाबत जागृती नक्कीच निर्माण होईल. त्यामुळे जलजागृतीच्या या लढ्याला व्यापकता येईल आणि असंख्य जलसाक्षर निर्माण होतील. निसर्गाचा समतोल ग्लोबल वार्मिंगमुळे बिघडत चालला असून दुष्काळासारखे प्रश्न भविष्यातही निर्माण होणार आहेत, त्याचा सामना करण्यासाठी जलजागृती होणे काळाची गरज आहे.