अंधश्रद्धेचे मूळ शोधून त्यावर घाव घालावाः उत्तम कांबळे
बुलडाणा (प्रतिनिधी) । 27 - अंधश्रद्धा निर्मूलन करताना अंधश्रद्धाचे मूळ शोधणे व त्यावर घाव घालणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध अंगाने त्याचा विचार व्हावा, असे प्रतिपादन नामांकित लेखक व विचारवंत अ.भा.साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.
अ.भा.अंनिसच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय मनोविकारांचा मागोवा शिबिर व चिंतन बैठकीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. स्थानिक राजीव गांधी सैनिकी शाळेमध्ये तीन दिवसीय शिबिराचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.ए.व्ही.सोनटक्के , राज्य संघटक दिलीप सोळंके, राज्य प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे पाटील, शरद वानखेडे, अशोक घाटे, राज्य महिला संघटक छाया सावरकर , प्रकल्प प्रमुख सुरेश झारेमुर, हरिभाऊ पातोडे, किशोर वाघ, दत्ता शिरसाट, शिवाजी पाटील यांची उपस्थिती होती. पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी शिबिराची प्रस्तावना केली, त्यामध्ये त्यांनी तीन कार्यक्रम व त्याचे महत्त्व विशद केले. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.ए.व्ही. सोनटक्के यांनी मनोरुग्णालयाची गरज विशद केली तर दिलीप सोळंके यांनी शिबिराची गरज व अंनिसचा प्रवास व पुढील वाटचाल यावर मार्गदर्शन केले. यानंतर अ.निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये कार्य करणार्या सर्मपित कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. या शिबिराला राज्यातील विविध जिल्हयतील 150 कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
त्यात मनोविकारांचा याप्रसंगी मागोवा घेतला जाणार असून, सैलानी येथे लक्ष संकलन केले जाणार आहे व त्याचा अहवाल शासनास सादर केला जाणार आहे, तसेच समितीच्या पुढील वाटचालीचे नियोजन करण्यात येणार आहे. संचालन प्रा.प्रतिभा भुतेकर व आभार दत्ता सिरसाठ यांनी मानले.