Breaking News

अतिक्रमण धारकांवर गुन्हे दाखल ?

 बुलडाणा (प्रतिनिधी) । 27 - बुलडाणा शहरातील अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा दुकाने थाटण्याचा प्रकार रंगपंचमीच्या दिवशी घडला. या विरोधात नगर पालीकेने बुलडाणा पोस्टेकडे पत्र दिले असून अतिक्रमण धारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तर बुलडाणा पोस्टेकडून अद्यापपर्यत कोणत्याही अतिक्रमण धारकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सदर प्रकरण चौकशीवर ठेवल्याचे समजते.शहरातील हटविण्यात आलेले अतिक्रमण आज अचानक पुन्हा अतिक्रमकांनी काही ठिकाणी दुकाने उभी करून पुन्हा अतिक्रमण थाटण्यास सुरुवात केल्याने एकच खळबळ उडाली. प्रशासनाला सलग चार दिवस सुट्या आल्यामुळे हा प्रकार कुणीतरी करावयास लावला असावा? मात्र, याचा बोलवता धनी कोण? याचा शोध 
प्रशासन घेत आहे. दरम्यान, सुटीचा दिवस असतानाही नगरपालिकेने अतिक्रमण करणार्यांना समज देऊन अतिक्रमण करणार्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा आदेश दिला. 
अतिक्रमणाचा विळखा बसलेले बुलडाणा शहर कायमचे टपरीमुक्त करण्याचा निर्धार करीत नगरपालिकेने 3 डिसेंबरपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. जवळपास 15 दिवस ही मोहीम चालली. शहरातील मुख्य रस्त्यापासून तर वार्डा-वार्डातील गल्लीबोळात असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. सुमारे 1400 टपरी दुकाने हटविण्यात आली होती. अतिक्रमण उठविल्यामुळे ज्या व्यावसायिकांचे उदरनिर्वाहाचे साधन कायमचे गेले, अशा गरजू छोट्या व्यावसायिकांचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेत शहरातील रिकाम्या असलेल्या शासकीय जागेवर ’बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर गाळे बांधून देण्याचा निर्णयसुद्धा घेतला आहे. सध्या त्यावर कारवाईही सुरू आहे. मात्र धूलिवंदनाच्या दिवशी सुटीचा दिवस पाहून शहरातील काही अतिक्रमकांनी पुन्हा त्याच जागेवर दुकाने लावण्यास सुरुवात केली. दुसरे दिवशीसुद्धा शहरातील अनेक भागात लघुव्यावसायिकांनी टपरी दुकाने थाटल्याचे दिसत होते. अचानकपणे अतिक्रमण करण्यास कोणी आदेश दिला, अशी चर्चा दिवसभर सुरू होती. शुक्रवार, 25 मार्च रोजी जिल्हा परिषद कार्यालयाच्या पाठीमागील भागात लोकांनी दुकाने थाटली. तर जिल्हा परिषद शाळेची भिंत तोडून शाळेच्या 
हद्दीत काही व्यावसायिकांनी दुकाने लावली. जि.प. अध्यक्षांच्या निवासस्थानासमोर, कोर्टाच्या बाजूला, जयस्तंभ चौक पुन्हा जागा अडवून ठेवल्याचे दिसत होते. शहरात अचानक सुरू झालेले हे अतिक्रमण पाहून हा काय प्रकार सुरू आहे? असा सवाल उपस्थित होत होता. या बाबत पोलिस विभागाकडून काय कारवाई केल्या जाते याकडे आता अतिक्रमण धारकांचे लक्ष लागले आहे.