पुसेगाव येथे गुरुवारी मांसविक्री न करण्याचा निर्णय
कराड, 28 - श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधिस्थळ असलेल्या पुसेगावात दर गुरुवारी मटण विक्री न करण्याचा पायंडा येथील मटण विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने धुळवडी दिवशीही पाळला. त्याबद्दल त्यांचे सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे कौतुक करुन आभार मानले.
याबाबत डॉ. सुरेश जाधव म्हणाले सेवागिरी महाराजांच्या समाधिस्थळामुळे पुनीत झालेल्या पुसेगावभूमीला गुरुवारी मटण विक्रीच्या निमित्ताने प्राण्यांची हत्या होऊ नये, यासाठी दोन वर्षापूर्वी येथील ग्रामसभेत मटण विक्री न करण्याचा निर्णय येथील मटण शॉप मालकांनी घेतला होता. त्यानुसार दर गुरुवारी रथोत्सवादिवशी व अमावस्येला मटण विक्रीची दुकाने बंद ठेवली जातात. यावर्षी गुरुवारच्या दिवशीच धुळवड आल्याने मटण विक्रीची दुकाने सुरु राहणार का? याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता हेाती. धुळवडीनिमित्त व्यवसायाची मोठी संधी असूनही गुरुवारी मटण विक्री न करण्याचा पायंडा मोडला जाणार नाही अशी भूमिका घेऊन येथील मटण विक्री व्यावसायिकांनी दुकाने स्वयंस्फूर्त बंद ठेवली. याबद्दल मटण विक्रेत्यांचे सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, विजय जाधव, शिवाजीराव जाधव, अॅड. विजयराव जाधव यांनी कौतुक करुन आभार मानले.