Breaking News

कानिफनाथांच्या यात्रौत्सवामुळे खर्डा परिसर भक्तिमय

 अहमदनगर । प्रतिनिधी । 28 -  हिंदू-मुस्लिमांचे श्रध्दास्थान असलेल्या खर्डा (ता. जामखेड) येथील ग्रामदैवत कानिफनाथांचा यात्रौत्सव उत्साहात पार पडला. यात्रेची सुरुवात कंदुरीने होते. दुसर्या दिवशी गावातून सवाद्य संदल मिरवणूक निघते. पहाटे फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीचे विसर्जन होते. 
होळीच्या दिवशी मोठया प्रमाणावर यात्रा भरली होती. यात्रेत मंदिराभोवती मानाच्या काठया फिरवून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. मंदिर कळसावर मानाची काठी ठेवून काठीचे पूजन करण्यात आले. ग्रामीण भागातून भाविक सजविलेल्या गाडीतून येतात हा कुतुहलाचा विषय असतो. खर्डा ग्रामपंचायतीने भाविकांसाठी मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. सेनेचे जामखेड तालुकाप्रमुख वैजिनाथ पाटील यांनीही थंड पाण्याची व्यवस्था केली होती. माजी राज्यमंत्री सुरेश धस व इतर मान्यवरांनी ग्रामदैवताचे दर्शन घेतले. कानिफनाथ यात्रौत्सवामुळे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे परिसर भक्तिमय बनला होता. जिल्हयासह इतर जिल्हयातुनही भक्तांनी हजेरी लावली.