थकीत करवसुलीसाठी कराड शहरात ढोल-ताशा
कराड, 28 - थकीत कराच्या वसुलीसाठी पालिकेने आजपासून थकबाकीदारांच्या दारात ढोल-ताशा वाजवण्यास सुरु केले आहे. दिवसभरात गुरुवार पेठ, मंडई परिसर, बाजारपेठेत अनेकांच्या दारात वाजणार्या बॅण्ड-बाजामुळे थकबाकीदार धास्तावले आहेत.
येथील पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कर वसुली प्रमुख राजेश काळे यांनी कंबर कसली आहे. प्रारंभी थकबाकीदारांच्या नावाच्या यादीचे फ्लेक्स कृष्णाबाई घाटावर लावले होते, त्यापाठोपाठ नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केली. कर वसूलीसाठी मुख्याधिकार्यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे अनेकांनी पालिकेत स्वत:हून रक्कम भरली आहे. त्यात एका विद्यमान नगरसेवकाने शास्तीचे सुमारे 40 हजार रुपयासह थकीत रक्कम भरल्याची जोरदार चर्चा आहे. अन्य रक्कमही पालिकेत जमा होत आहे. वारंवार मागणी करूनही व कारवाईची भीती दाखवूनही थकबाकीदार कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करत असल्याने दारात ढोल-ताशा वाजवण्यास प्रशासनाने सुुरु केले आहे. वसुलीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी थकबाकीदाराच्या नावाचे फ्लेक्स व त्यांच्या दारात ढोल-ताशा लावण्याच्या निर्णयावर ठाम राहत मुख्याधिकार्यांनी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली. त्यामुळे वसुलीच्या कामाला जोर लागला आहे. चालू वर्षीची वसुली सुमारे 80 टक्के झाली असून, थकीत वसुलीचे प्रमाण वाढू लागल्याचे सांगण्यात आले. पालिकेच्या ढोल-ताशाच्या भीतीने थकबाकीदार घराला टाळा लावून पसार झाले आहेत. त्यामुळे ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. थकबाकीदारांनी कराचा भरणा न केल्यास त्यांच्या मालमत्तेच्या जप्तीच्या कारवाईसह मिळकतीवर पालिकेचा बोजा नोंद करण्याची कार्यवाही केली जाणार आहे, असल्याचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सांगितले.