Breaking News

होळी खेळायला नकार देणार्‍या विवाहित प्रेयसीची हत्या, प्रियकर अटकेत

मुंबई, प्रतिनिधी, दि. 26 -  विवाहित प्रेयसीने होळी खेळायला नकार दिल्याने चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या पतीसमोरच धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीची हत्या करून स्वत:वरही वार करून प्रियकराने आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो जखमी झाला असून, त्याच्यावर उल्हासनगरच्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत. 
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ही घटना अंबरनाथमधील पूर्व भागातील दुर्गापाडा परिसरात घडली आहे. प्रभावती प्रामाणिक (36) असे या मृत विवाहित प्रेयसीचे नाव आहे. तर मनोरंजन कडू (24) असे जखमी प्रियकराचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, प्रभावती व तिचे पती मूळचे ओडिशामधील आहेत. नोकरीनिमित्ताने सध्या ते अंबरनाथमधील दुर्गापाडा परिसरात राहतात. तर प्रभावती यांच्या शेजारीच ओडिशातील त्यांच्या गावाकडचा मनोरंजन कडू हा तरूण राहयचा. गेल्या काही महिन्यापासून प्रभावती आणि मनोरंजन यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याची कुणकुण पतीला लागली होती. मात्र, शेजारीच राहत असल्याने व गावाकडील असल्याने प्रभावतीचा पती शांत होता. मात्र, गुरुवारी मनोरंजन होळी खेळण्यासाठी प्रभावतीच्या घरी रंग घेऊन आला. मात्र, पती घरातच असल्याने प्रभावतीने त्याला होळी खेळण्यास नकार दिला. त्यामुळे मनोरंजन चिडला व पतीसमोरच प्रभावतीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात प्रभावती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रूग्णालयात दाखल केले मात्र तिचा मृत्यू झाला. दुसरीकडे, प्रेयसीवर वार केल्यानंतर मनोरंजननेही आपल्या अंगावर सपासप वार करून घेतले. यात तोही जखमी झाला आहे. त्याला उल्लासनगरमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.