ठाणे जिल्ह्याला 50 एमएलडी अतिरिक्त पाणी
मुंबई, प्रतिनिधी, दि. 26 - ठाणे जिल्ह्याला भातसा धरणातून 50 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे, अशी माहिती ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ठाणे जिल्ह्याला मिळणार्या या अतिरिक्त पाण्याचे स्टेमद्वारे वाटप करण्यात येणार आहे. ठाणे व भिवंडी महापालिकेला प्रत्येकी 15 एमएलडी, तसेच उल्हासनगर व मिरा-भाईंदर महापालिकेकरता प्रत्येकी 10 एमएलडी पाणी मिळेल. कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी एमआयडीसीद्वारे 10 एमएलडी पाणी देण्यात येईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
ठाणे जिल्ह्याला भेडसावणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन ठाण्याचे महापौर संजय मोरे, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, भिवंडीचे महापौर तुषार चौधरी, उल्हासनगरच्या महापौर अपेक्षा पाटील, मिरा-भाईंदरच्या महापौर गीता जैन यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. याबाबत ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विशेष पाठपुरावा केला होता. या बैठकीस आमदार रूपेश म्हात्रे, सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, नरेंद्र मेहता आदी उपस्थित होते. ठाणे जिल्ह्याला भेडसावणारी पाणीटंचाई आणि उपलब्ध पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत कसा टिकवावा, हा यक्षप्रश्न महापालिकांसमोर असून, या निर्णयामुळे तात्पुरता दिलासा मिळणार आहे. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या वाढत असून, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ठाणे जिल्ह्याला स्वत:चे कायमस्वरूपी धरण असावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शहापूर शहराला बाहुली धरणातून पाणी देण्याकरता युद्धपातळीवर काम सुरू आहे, असेही ते म्हणाले. ठाणे जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाचा प्राधान्याने विचार करून तातडीने अतिरिक्त पाणी
दिल्याबद्दल जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे शिंदे यांनी आभार मानले.