Breaking News

दुष्काळमुक्तीसाठी चार गावांची एकजूट

मुंबई, प्रतिनिधी, दि. 27 -  राज्यात अनेक गावांमध्ये दुष्काळाने उग्र रूप धारण केले आहे. या दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार व सामाजिक संस्था विविध प्रयत्न करीत आहेत. पण सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी असलेल्या माण तालुक्यातील पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी आणि दिवडी या गावांतील सामान्य जनतेने एकत्र येऊन दुष्काळमुक्तीसाठी चार गाव जलयुक्त शिवार अभियान ही मोहीम हाती घेतली आहे. 
गोरगरीब मजूर, शेतकरी, महिला, स्थलांतरित झालेले नोकरदार, हितचिंतक यांनी पै पै जमा करून जलसंधारणाची कामे केली आहेत. लोकसहभागाच्या अनुषंगाने या चार गावांच्या मुंबईतील नोकरदारांचे संमेलन येत्या 27 मार्च रोजी रूईया महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत ही नोकरदार मंडळी आपल्या गावांना कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी विचारमंथन करतील. 
या कार्यक्रमासाठी अभिनेते व चार गावांचे मार्गदर्शक तथा ब्रँड ऍम्बेसिडर सयाजी शिंदे, राज्याच्या जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, दै. सकाळच्या सातारा आवृत्तीचे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे आदी उपस्थित राहणार आहेत. गावांचा विकास व कायमच्या दुष्काळमुक्तीसाठी स्थलांतरित भूमिपुत्रांचे कर्तव्य या विषयावर मान्यवर मार्गदर्शन करतील. 
राज्याच्या जलयुक्त शिवार अभियानात गेल्या वर्षी अधिकृत समावेश नसतानाही या चार गावांनी एकजूट करून स्वतःच जलसंधारणाची कामे हाती घेतली. सीसीटी, डीप सीसीटी, जुन्या तलावांमधील गाळ काढणे, ओढ्यांचे खोलीकरण-रुंदीकरण अशी जवळपास 20 लाख रुपयांची कामे लोकांनी स्वखर्चातून उभी केली. या गावांतील लोकसहभाग पाहून अभिनेते सयाजी शिंदे यांनीही मग मदतीचा हात पुढे करीत जवळपास सात लाख रुपये खर्चाची जलसंधारणाची कामे केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी आठ तज्ज्ञांची एक टीम तयार केली असून, ते दर महिन्याला या गावांत येतात. लोकांसोबत बसून कामाचे नियोजन करतात. या चार गावांमध्ये व्यापक प्रमाणात वृक्षारोपण हाती घेऊन पुढील चार ते पाच वर्षे त्यांचे संगोपन करण्यासाठी आता सयाजी शिंदे यांनी कँबर कसली आहे. 
विशेष म्हणजे, गावातील सामान्य जनतेचा उत्साह पाहून राज्य सरकारने दखल घेत या चार गावांचाही येत्या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार अभियानात समावेश केला आहे. राज्याचे जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांनी या गावांमध्ये जाऊन पाहणी केली आणि तत्काळ पावणेदोन कोटी रुपयांचे सिमेंट बंधारे मंजूर केले. या पार्श्‍वभूमीवर चार गावांतील नोकरदारांचे स्नेहसंमेलन येत्या रविवारी, 27 मार्च रोजी माटुंगा येथील रूईया महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता हा सोहळा होईल. या वेळी चार गावांनी दुष्काळमुक्तीसाठी केलेल्या कामांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.