राज्यात निधर्मी’ नागरिकांचे प्रमाण वाढले
मुंबई, प्रतिनिधी, दि. 27 - जनगणनेमध्ये धर्माची नोंद न करणार्यांचे प्रमाण राज्यामध्ये लक्षणीय असल्याचे निरीक्षण राज्याच्या 2015-2016 च्या आर्थिक पाहणीत नोंदविण्यात आले आहे. 2011 च्या जनगणनेत प्रथमच ज्यांना धर्माची नोंद करायची नाही अशांची स्वतंत्र नोंद घेण्यात आली होती.
यापूर्वी कधीच अशी नोंद करण्यात आली नसल्याने धर्माची नोंद न करणार्यांचे प्रमाण निश्चित करता येत नव्हते. आता मात्र त्यांची निश्चित संख्या सांगता येणार आहे. राज्यात धर्म न सांगितलेल्यांची संख्या दोन लाख 86 हजार 290 इतकी आहे. यामध्ये पालघरसह विभाजित न झालेल्या ठाण्यामध्ये धर्म न सांगितलेल्यांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक 37 हजार 83 इतके आहे. त्याखालोखाल पुण्यामध्ये याचे प्रमाण 26 हजार 105 इतके तर मुंबई उपनगरामध्ये 22 हजार 726 इतके प्रमाण आहे.
राज्याच्या नऊ कोटी लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या अगदीच किरकोळ वाटली, तरी त्यांची आवर्जून नोंद घेण्यासारखीच आहे. मुंबई-पुण्यासारखी शहर सोडूनही छोट्या जिल्ह्यांमध्येही धर्म न सांगणार्यांचे प्रमाण नोंद घ्यावी अशी आहे. जळगावमध्ये 20 हजार 928, यवतमाळमध्ये 10 हजार 507 आणि नागपूरमध्ये 10 हजार 499 अशी संख्या आहे. इतकेच काय राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात धर्माची नोंद न करणार्यांचे प्रमाण दीड ते दोन हजारांपासून दहा ते बारा हजारांपेक्षा अधिक आहे.
छोट्या शहरांमध्येही याचे प्रमाण दिसून येत आहे. एका बाजूला धर्माच्या नावाखाली विविध राजकीय पक्ष आपापले अंजेडा राबवत असताना माणुसकीच्या धर्माचा आदर करणार्यांचे प्रमाण अगदी नंदूरबार आणि गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्येही वाखाणण्यासारखे आहे. नंदूरबारमध्येही धर्म न सांगणार्यांचे प्रमाण सात हजार 276 इतके, तर गडचिरोलीमध्ये सहा हजार 719 इतके आहे.