दिव्याची हुलकावणी; पण तिजोरीच्या चाव्या मात्र मिळविल्या मामांच्या सामाजिक बांधिलकीला सभापती पदाची गवसणी
कुमार कडलग/नाशिक। 25 - राजकारणासाठी राजकारण नव्हे तर समाजकारणासाठी राजकारण करण्याची उर्मी विद्यमान राजकारणात फारच कमी नेत्यांमध्ये आढळते. मात्र सामाजिक बांधिलकीचे भान बाळगून राजकारण करणार्या त्या संख्येने अल्प असलेल्या अशा राजकीय मंडळींच्या पदरात प्रत्यक्षात इच्छीत यश पडत नसले तरीदेखील समाजमनात त्यांनी निर्माण केलेले अढळ सत्ता स्थान मात्र कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि याच सत्तास्थानाची दखल कधीतरी राजकारणातील अर्थकारणालाही घ्यावी लागते. राजकारणात बेरकी म्हणून ओळखल्या जाणार्या मंडळींनाही अशा सामाजिक बांधिलकी जपणार्या प्रामाणिक इच्छाशक्तीला हात द्यावाच लागतो.
काल संपन्न झालेल्या मनपा स्थायी समिती सभापतीच्या निवडणूकीतही साधारण हेच चित्र पहायला मिळाले. 11 विरुद्ध 5 अशा प्रचंड फरकाने मनसेचे प्रभाग 19 चे नगरसेवक सलीम (मामा) शेख यांनी अखेर मनपात मानाचे समजले जाणारे सत्तापद मिळविले. खरेतर नाशिककरांमध्ये मामा म्हणून परिचीत असलेले सलीम शेख हे मनसेचे नगरसेवक असले तरी त्यांच्या कामाला पक्षीय चौकटीने कधीही बांधून ठेवले नाही. सामान्य माणसासाठी धावणारा नगरसेवक हीच खरी त्यांची ओळख आहे. गेल्या महापौर पदाच्या निवडणूकीत खरे तर दिवा त्यांनाच मिळेल असे आडाखे बांधले जात होते. मात्र तत्कालीन राजकारणाने सलीम शेख यांना दिव्यापासून वंचित ठेवले. तेव्हाच नाशिककरांमध्ये हक्काचा महापौर लाभला नसल्याची खंत व्यक्त केली
जात होती. यंदाच्या स्थायी सभापती निवडणूकीत मात्र सभापतीपदी त्यांची निवड झाल्याने दिवा हुकला असला तरी मनपा तिजोरीच्या चाव्या मात्र सामान्य नाशिककरांच्या हातात आल्याचे समाधान व्यक्त होत आहे.
जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणूसकीचे नाते जपणारा हा नगरसेवक नाशिककरांना खर्या अर्थाने भावला असून आगामी काळात स्थायी समिती विषयी असलेली चर्चा सकारात्मक दिशेने वाटचाल करील याविषयी खात्री व्यक्त केली जात आहे. सलीम शेख यांच्यावर सभापती पदाच्या निमित्ताने मोठी जबाबदारी पडली आहे. महापालिकेचा गाडा हाकणार्या रथाला असलेले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोन चाकांची सांगड घालण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असताना उपलब्ध निधीत शहर विकासाचे नियोजन करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. हे आव्हान ते खुबीने पेलतील याविषयी नाशिककरांना खात्री आहे.