‘रॉ’ च्या अधिकार्याला अटक केल्याचा पाकिस्तानचा दावा
इस्लामाबाद/वृत्तसंस्था । 26 - भारतीय गुप्तचर संस्था अर्थात ‘रॉ’ च्या अधिकार्याला अटक केल्याचा पाकिस्तानने दावा केला असून, याप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त गौतम बामबावले यांना समन्स बजावले आहे.
अटक केलेला ‘रॉ’ चा अधिकारी बलुचिस्तान आणि कराचीमध्ये घातपाती कारवायांमध्ये सक्रीय होता असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अटक केलेल्या अधिकार्याचे नाव कुल यादव भूषण असून, तो भारतीय नौदलात अधिकारी आहे असा दावा बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर सरफराझ बुग्ती यांनी केला आहे. भूषण स्वतंत्र बलुचिस्तानचे समर्थक आणि अतिरेक्यांच्या संपर्कात होता असा दावा पाकिस्तानने केला आहे. बुग्ती यांनी भूषण यांना कुठून अटक केली ते स्पष्ट केलेले नाही. पाकिस्तानने यापूर्वी भारतावर बलुचिस्तान आणि कराचीमध्ये होणार्या हिंसाचारामध्ये सहभागी असल्याचा आरोप केला होता. पण प्रथमच त्यांनी रॉ च्या अधिकार्याला अटक केल्याचा दावा केला आहे. भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कुठल्याही देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यात भारताला रस नाही, पाकिस्तानात अटक झालेल्या व्यक्तीचा सरकारशी काहीही संबंध नाही त्याने मुदतीआधीच निवृत्ती स्वीकारली होती, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.