बदला घेण्याच्या भावनेनेच भारताविरोधात षडयंत्र : हेडली
मुंबई, 25 - बदला घेण्याच्या भावनेनेच भारताविरोधात षडयंत्र रचल्याची माहिती डेव्हिड कोलमन हेडलीने आपल्या जबाबात दिली आहे. यावेळी हेडलीने शिवसेना, बाळासाहेब आणि भारतद्वेष का? याबाबतचा खुलासा केला.
1971 च्या युद्धावेळी भारताने केलेल्या विमान हल्ल्यात आमची शाळा उद्ध्वस्त झाली होती. यामुळे तिथे काम करणारे लोक मारले गेले. तेव्हापासूनच माझ्या मनात भारताबद्दल तिरस्कार निर्माण झाला, असे हेडली म्हणाला. या घटनेनंतरच भारताचा बदला घेण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच भारताविरोधी द्वेषाची बीजे रोवल्याचे हेडलीने सांगितले. त्यादृष्टीने काश्मिरी लोकांना मदत करण्याचा मानसही होता, असे हेडली म्हणाला. दरम्यान, अमेरिकेत शिवसेनेसाठी निधी संकलनाचा कार्यक्रम आयोजित करुन बाळासाहेबांना बोलावण्याचा त्याचा विचार होता. त्यासाठी राजाराम रेगेंच्या संपर्कातही होतो. याबाबात लष्कर ए तोयबाशी केवळ चर्चा झाली होती. जर बाळासाहेबांची प्रकृती ठीक नसती तर, उद्धव ठाकरे किंवा अन्य शिवसेना नेत्यांना या कार्यक्रमाला बोलवण्याचा विचार होता. मात्र त्यावेळी अमेरिकेत त्यांच्यावर हल्ल्याचा कोणताही कट नव्हता, असेही स्पष्टीकरण हेडलीने दिले.