देसाई कारखान्यावर पुन्हा सत्ताधारी देसाई गट सत्तेत
सातारा, 26 - संपूर्ण सातारा जिल्ह्यासह सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी आमदार शंभूराज देसाई गटाच्या स्व. शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलने 6 हजार 200 इतक्या मताने जय मिळविला. विक्रमी मताधिक्य घेतल्यानंतर पाटण मतदार संघात देसाई गटाने गुढी पाडव्या अगोदरच विजयाची गुढी उभारून विजयोत्सव साजरा केला. दरम्यान, सत्ताधारी देसाई गटाचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले.
पाटण शहराच्या बाहेरील शिरळ येथील शासकीय गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र सबनीस, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. आर. जाधव यांच्या उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ झाला. सत्ताधारी देसाई गटाच्या दीपाली पाटील व विश्रांती देशमुख यांनी महिला राखीव मतदारसंघातून विजयाची मुहूर्तमेढ रोवली. आमदार शंभूराज देसाई सर्व निकाल हाती येईपर्यंत स्वत: उपस्थित होते.
आमदार देसाई यांच्या नेतृत्वाखालील कै. शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे : महिला राखीव गट- विश्रांती देशमुख, दीपाली पाटील, सर्वसाधारण गट - आनंदराव चव्हाण, दिलीपराव चव्हाण, सोमनाथ खामकर, अशोक डिगे, शंभूराज देसाई, पांडुरंग नलवडे, शशिकांत निकम, अशोकराव पाटील, राजाराम पाटील, व्यंकट पाटील, संपत सत्रे आदी उमेदवार विजयी झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र सबनीस यांनी जाहीर केले. याप्रसंगी सहाय्यक निवडणूक अधिकारी व्ही. जी. जाधव, नायब तहसीलदार विजय माने, राजेश जाधव, राजेंद्र तांबे तसेच परिविक्षाधीन नायब तहसीलदार ऋतुजा कदम उपस्थित होते. कारखान्याची निवडणूक 17 जागांसाठी झाली असली तरी 11 जागा सर्वसाधारण गटातून व 2 जागा महिला मतदारसंघातून मताधिक्याने विजयी झाल्या. अनुसूचित जाती मतदारसंघातून बबन बळी भिसे, इतर मागास मतदारसंघातून राजेंद्र येडू गुरव, भटक्या विमुक्त मतदारसंघातून विकास बाळकू गिरीगोसावी व संस्था ब गटातून शंकर पांडुरंग शेजवळ यांची बिनविरोध निवड झाल्याचे सबनीस यांनी जाहीर केले.