Breaking News

सांघिक प्रयत्नातून खंडाळा साखर कारखान्याची उभारणी : मदन भोसले

खंडाळा, 26 - तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात दोन दशकांपूर्वी प्रतापराव भोसले खासदार असताना खंडाळा कारखान्याला परवाना मिळाला. एकवीसाव्या वर्षात या कारखान्याचे भाग्य उजाळले असले तरी सांघिक प्रयत्नातून साखर कारखान्याची उभारणी होऊन संपन्न झालेला पहिला बॉयलर अग्नी प्रदीपन ही भविष्यातील खंडाळा तालुक्यातील कृषी औद्योगिक विकासाची नांदी आहे, असा विश्‍वास किसन वीर-खंडाळा-प्रतापगड परिवाराचे प्रमुख मदन भोसले यांनी व्यक्त केला.
किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या पहिल्या बॉयलरचे अग्नि प्रदीपन पाच दांम्पत्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी किसन वीरचे उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर, मिटकॉन कन्सलटंन्सीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रदीप बावडेकर, सेवानिवृत्त साखर संचालक डी. बी. गावीत, आर्थिक सल्लागार एन. एस. पाटील, ज्ञानदिप पतसंस्थेचे चेअरमन जिजाबा पवार, वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. विनय जोगळेकर, खंडाळा कारखान्याचे कार्यकारी संचालक ए. बी. जाधव, किसन वीरचे प्रभारी कार्यकारी संचालक एन्. बी. पाटील, दोन्ही कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित होते.
खंडाळा साखर कारखाना उभारणीचे प्रतापराव भोसले यांचे स्वप्न सत्यात उतरविल्याचा आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असल्याचे सांगून मदन भोसले पुढे म्हणाले, खंडाळा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मालकीचा साखर कारखाना प्रत्यक्षात सुरू होत असताना दोन गोष्टींची ऐतिहासिक नोंद ठेवावी लागेल. गेल्या दोन-तीन वर्षात ज्या एक्यान्नव साखर कारखान्यांना परवाने मिळाले, त्यामध्ये खंडाळा हा सहकारातील शेवटचा कारखाना म्हणावा लागेल. त्याचप्रमाणे एका सहकारी साखर कारखान्याने सहकार कायद्याच्या कलम 20 प्रमाणे दुसर्‍या सहकारी साखर कारखान्याची केलेली उभारणी ही देशातील सहकारी साखर उद्योगातील एकमेव उदाहरण आहे. 
या दोन गोष्टींची ऐतिहासिक नोंद होताना खंडाळ्याच्या संचालकांनी वैयक्तिक मालमत्ता गहाण ठेऊन कारखाना उभारणीत दिलेले आर्थिक योगदानही तितकेच महत्वाचे आहे. दोन्ही कारखान्याचे संचालक, सभासद शेतकरी, विविध कंपन्यांचे कंत्राटदार, हितचिंतक यांच्या अथक प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या खंडाळा कारखान्याचा पुढील हंगामात पुर्ण क्षमतेने सुरू होईल, त्यावेळी शेतकर्‍यांना शेअर्स घ्या म्हणण्याची वेळ येणार नाही. येणारी संकटे तुडवत जाण्याचे काम आम्ही करतो. कारखान्याच्या सर्वच घटकांनी आपल्या वाटेल्या आलेल्या भूमिका कणखरपणे निभवाव्यात, असे आवाहन करून मदन भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.
खंडाळा साखर कारखाना उभारणीसाठी वीस वर्षे सातत्याने प्रयत्न केले. मात्र, केवळ मदन भोसले यांनी या कारखाना उभारणीचे शिवधनुष्य उचलल्यामुळे हा कारखाना पुर्णत्वास गेला. माझी भूमिका नेहमी स्वयंसेवकाची राहिली आहे, त्यातच मी आनंद मानलेला आहे. कारखान्याच्या अडचणीच्या काळात ज्ञानदिप पतसंस्था धावून आली. संचालक मंडळ, सभासद शेतकर्‍यांप्रमाणेच या संस्थेचेही कारखाना उभारणीत मोलाचे योगदान आहे, असे शंकरराव गाढवे यांनी सांगितले. 
कारखाना होऊच नये यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या विरोधकांचे आता या कारखान्याकडे लक्ष लागेल. पारदर्शकपणे कारभार करण्याची मदन भोसले यांची नियत असल्यामुळेच एका कारखान्याचे तीन कारखाने झाले. खर्‍या अर्थाने सहकार चळवळ वाढविण्याचे काम त्यांनी केलेले आहे. हा कारखाना भविष्यात खंडाळा तालुकावाशियांच्या विकासाचे केंद्र होईल, असे सांगून श्री. बाबर यांनी प्रतापरावभोसले व या कारखान्यासाठी जमिनी दिलेल्या शेतकर्‍यांचे गजानन बाबर यांनी आभार मानले.
बाबा लिमण, दत्तात्रय शेवते, विकास कदम यांनी सुत्रसंचालन केले. स्वागत संचालक नंदकुमार निकम यांनी केले. संचालक रतनसिंह शिंदे यांनी आभार मानले. मान्यवरांचा सत्कार संचालक मंडळाने केला. कार्यक्रमास दोन्ही कारखान्यांचे संचालक, सभासद शेतकरी, कंत्राटदार, विविध गावचे सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.