Breaking News

प्रसंगी शिवसेना रस्त्यावर उतरेल : बानुगडे-पाटील

सातारा, 26 - हिंदुस्थान हा आमचा श्‍वास आहे, तर महाराष्ट्र हा आमचा ध्यास आहे. अखंड महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा कोण करत असेल, तर त्यास शिवसेना कडाडून विरोध करेल. प्रसंगी त्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेना उपनेते व सातारा-सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी दिला.
शिवसेनेत प्रवेश केलेल्यांचा सत्कार व शिवसैनिकांच्या मेढा (ता. जावळी) येथील यशोदिप मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. सर्वसामान्य शेतकर्‍यांसाठी, दुष्काळठास्तांच्या मदतीसाठी शिवसेना कायम तुमच्या सोबत असून सातारा-जावळीत पुन्हा एकदा भगवा फडकावण्यासाठी एकजुटीने तयार राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मेळाव्यास शिवसेना जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत जाधव, एकनाथ ओंबळे, एस. एस. पार्टे गुरूजी, तालुकाप्रमुख संजय सुर्वे, श्रीहरी गोळे, प्रविण पवार, रामचंद्र चिकणे, संदीप पवार, सचिन जवळ, सचिन करंजेकर, राजू शेलार, शांताराम कदम, बाळासाहेब शिर्के आदि उपस्थित होते. यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या विश्‍वनाथ धनावडे, राजूशेठ गोळे, रवींद्र परामणे, अंकुश बेलोशे, ज्ञानेश्‍वर शेलार, शिवाजी जाधव यांचा तसेच याच मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केलेल्या श्रीकांत रांजणे, दत्ता रांजणे, सचिन शेलार, सुजित सुर्वे आदिंच्या खांद्यावर भगवा देवून सत्कार करण्यात आला.जावळीतील शिवसैनिक हा कडवा असून येथे शिवसेना अधिक बळकट होत असल्याचे चंद्रकांत जाधव यावेळी म्हणाले, तर जावळीतील शिवसेना पुन्हा जोमाने कामाला लागली असून पंचायत समितीवर भगवा फडकवण्याचा निर्धार एकनाथ ओंबळे यांनी व्यक्त केला. मेळाव्यास शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.