मुंबईत पुन्हा हल्ल्याचा इशारा
मुंबई, प्रतिनिधी, दि. 27 - मुंबईवर पुन्हा सागरीमार्गे दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी याबाबतची माहिती महाराष्ट्र पोलिसांनाही दिली आहे. त्यामुळे शहरातील सागरी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शहरात येणार्या सर्व मार्गांवर दक्ष राहण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
शिवरात्रीच्या दिवशी लष्करे तय्यबाचे दहशतवादी गुजरातमधील मंदिरामध्ये घातपाती कृत्य करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने गुजरात पोलिसांना दिली होती. त्यानंतर राज्यातही दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. असे असताना पुन्हा एकदा दहशतवादी हे मुंबई आणि दिल्ली येथे घातपाती कारवाया करणार असल्याच्या सूचना केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने महाराष्ट्र पोलिसांना दिल्या आहेत. गुजरातमधील अलर्टवर महाराष्ट्र पोलिस काम करत असल्याचे एका वरिष्ठ आयपीएस अधिकार्याने सांगितले. काही दिवसांपूर्वी पोलिस नियंत्रण कक्षात निनावी फोन आला होता. त्याबाबत तपास सुरू आहे. त्यामुळे माहिती उघड करता येत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने स्पष्ट केले.
एका देशातील नागरिक असलेल्या 7-8 जणांनी इसिसमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतले आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर दहशतवादी कारवाया करण्यासाठी सागरीमार्गे मुंबईत येणार आहेत. दिल्लीही त्यांच्या टार्गेटवर आहे. हल्ला आणि ठिकाण याबाबत गुप्तचर यंत्रणेने पोलिसांना अधिक माहिती दिलेली नाही. पण काही ठिकाणी सुरक्षेत वाढ करावी, अशा सूचना दिल्या आहेत.
मुंबईत येणार्या बोटींची तपासणी केली जात आहे. तटरक्षक आणि नौदल यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच विमानतळावरही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
सागरी पोलिस तैनात
दहशतवादी हे समुद्री मार्गे मासेमारांच्या वेशात मुंबईत दाखल होऊ शकतात, अशी शक्यताही गुप्तचर यंत्रणेने वर्तवली आहे. त्यामुळे सर्व सागरी मार्गांवर खबरदारीचा इशारा दिला आहे. जेथे जेट्टी आहेत, त्या ठिकाणी सागरी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.