Breaking News

सातारा बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करा खा. उदयनराजे

सातारा, 27 -  सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कथित अनियमित बाबी आणि अनधिकृत भाराबाबत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांना निवेदन देवून सखोल चौकशीची मागणी केली आहे. याबाबत आम्ही सहकार मंत्र्यांनाही निवेदन देणार असून, चौकशी न झाल्यास जनक्षोभ होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 
सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देेशून लिहिलेल्या या निवेदनाची प्रत सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनाही दिली आहे. सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बर्‍याच बाबी अनियमितपणे आणि संबंधीत नियम-कायदे धाब्यावर बसवून केल्या जात असून, या समितीचे तत्कालीन सचिवही लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले होते. त्यामुळे शेतकर्‍यांची आस्था असलेल्या संस्थेत सहकाराच्या नावाखाली काय काय धंदे चालतात याचा प्रत्यय शेतकर्‍यांसह सर्वसामान्य जनतेला आला आहे. बाजार समितीच्या जागांची विल्हेवाट कशा प्रकारे लावावी याचे उत्तम अनैतिक उदाहरण म्हणून सातारा बाजार समितीकडे पहावे, अशी मानसिकता शेतकरी वर्गाची झाली आहे. सबब, प्रामुख्याने तीन मुद्यांची चौकशी आपल्या अखत्यारित स्वतंत्रपणे करण्याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.बाजार समितीच्या मालकीच्या गाळे जागांवर शेतीपूरक किंवा शेती व्यवसाय अपेक्षित आहे. तथापि प्रचंड नफा कमावण्याच्या उद्देशाने अनेक धंदे, त्यात नितीमत्ता गुंडाळून, लॉजिंग, मद्य विक्रीही अनेक गाळ्यांमधून होत आहे. याबाबत बाजार समितीने कोणता हेतू ठेवून या व्यवसायांना जागा उपलब्ध करुन दिली याची चौकशी महत्वाची आहे. बाजार समितीस प्राप्त होणारे सेस स्वरुपाचे उत्पन्न पाहता यामध्ये प्रचंड तफावत आढळून येते. सबब सेस उत्पन्नाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. बाजार समितीने भाडेपट्ट्याने जिल्हा ग्राहक संघाला दिलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे मोठे व्यापारी संकूल उभारण्याचे काम सुरू आहे.
 याबाबत सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. बाजार समिती आवारात नियमित शेती मालासाठी दिलेले गाळे, भुखंड व प्लॉट हे नियमित शेतीमालाच्या उद्देशासाठी न वापरता अनधिकृत व्यवसाय यामधून होत आहेत. तो अनधिकृत वापर तातडीने थांबवण्यात यावेत व असे व्यवसाय कसे सुरु ठेवले गेले याची तातडीने चौकशी करावी. आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. निवेदन देताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवि साळुंखे, माजी सभापती सुनील काटकर, प्रतापभाऊ शिंदे, बाबासाहेब घोरपडे, काका धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.