Breaking News

महाराष्ट्राने विदर्भावर कायमच अन्याय केला : श्रीहरी अणे

नागपूर, 26 - विदर्भासह मराठवाड्यालाही स्वतंत्र राज्य करावे असे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या महाधिवक्तापदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या श्रीहरी अणे यांचे आज सकाळी नागपूरात आगमन झाले. नागपूरात येताच अणे यांचे जल्लोषात व जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी मला विदर्भात परतल्याचा अर्वणनीय आनंद झाला आहे. हा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही अशी प्रतिक्रिया अणे यांनी दिली. तसेच आगामी काळात स्वतंत्र विदर्भासाठी काय करता येईल याची चाचपणा आम्ही करीत आहोत. याबाबतची भूमिका आज सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेत देऊ असे सांगत अणेंनी ’जय विदर्भ’चा पुन्हा एकदा नारा दिला. गेल्या 60 वर्षात विदर्भ महाराष्ट्रात एकदिलाने कधीच नांदला नाही. महाराष्ट्राने विदर्भावर कायमच अन्याय केला. हा अन्याय भविष्यातही नको असेल तर स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नाही. विदर्भाच्या वाट्याचे पैसे पश्‍चिम महाराष्ट्राने कायमच चोरले. विदर्भ वेगळा झाला तर ते पैसे त्यांना मिळणार नाहीत त्यामुळेच त्यांचा विरोध आहे. त्यांच्या भल्यासाठी विदर्भ वेगळा होऊन काय खाणार असा सवाल करतात पण मी म्हणतो, आम्ही काय खावू याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमचा विचार करा, असा घाणाघात श्रीहरी अणे यांनी केला. 
अणे म्हणाले, यशवंतराव चव्हाणांपासून ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत सर्वांनी विदर्भावर अन्याय केला. विदर्भाचा विचार कधीच केला गेला नाही. दरवर्षी विदर्भाचा अनुशेष उर्वरित महाराष्ट्रात वळविला जातो. राज्यपालांनी आदेश देऊनही हा निधी दिला जात नाही. विदर्भाप्रमाणे मराठवाड्यावरही अन्याय होत आलाय. म्हणूनच मी मराठवाडाही स्वतंत्र झाला पाहिजे असे मत मांडले. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे माझे पाय तोडू म्हणतात पण ते जाऊ द्या. ते माझे पक्षकार आहेत. अगदी बाळासाहेबही होते. पण ती त्यांची भूमिका नसून शिवसेनेची आहे. सरकार फार काही करू शकत नसल्याची स्थिती आहे. मराठवाड्यात शेती करायला सोडा प्यायला पाणी मिळत नाही यावरून स्थिती पाहा. विदर्भात धरणे का बांधली गेली नाहीत. शेतक-यांना तर 
वा-यावरच सोडून दिले आहे अशी टीका अणेंनी केली.