सराफ असोसिएशनतर्फे सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
सातारा, 27 - केंद्र सरकारने लावलेल्या अबकारी कराच्या विरोधात सातारा शहरातील सराफांनी पुकारलेला बंद 26 व्या दिवशीही कायम राहिला. केंद्रातील भाजप सरकार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ शहरातील अनेक सराफांनी राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी ’एक्साईज हटाव, सोनार बचाव’ असा फलक हाती घेऊन सराफ सहभागी झाले होते.
केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात सोन्याचे दागिने आणि ज्वेलरी व्यवसायावर एक टक्का अबकारी कर वाढविला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार असल्याचा आक्षेप घेत दि. 1 मार्चपासून देशव्यापी काम बंद आंदोलन पुकारले आहे. सातारा जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले असून जिल्ह्यातील सर्वच सराफ व्यवसायिक त्यामध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान, बुधवारी सराफांनी शासन आदेशाची होळी केली तर शुक्रवारी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. पाचशे एक पाटी, मोती चौक, देवी चौक मार्गावर निघालेल्या या प्रतिकात्मक अंत्ययात्रेत अनेक सराफ सहभागी झाले होते. यावेळी मामा नागोरी, शहराध्यक्ष मोतीलाल उपाध्यक्ष नंदकुमार बेनकर, श्रेणिक शहा, राहुल करमाळकर, नितीन घोडके, चंद्रशेखर घोडके, पंकज
नागोरी, समीन महामुने, आनंद देवी, वीरु घोडके आदी उपस्थित होते. सातारा शहरातील सराफांनी अबकारी कराच्या विरोधात केंद्र सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.